। नवी मुंबई | प्रतिनिधी |
रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरवर भरधाव वेगातील टेम्पो धडकल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. उरण-बेलापूर मार्गावर बुधवारी (दि.1) पहाटे ही घटना उलवे येथे घडली. या अपघातप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतून भिवंडीकडे निघालेलया टेम्पोला पहाटे पावणे पाचच्या सुमारास उरण-बेलापूर मार्गावरील उलवे येथे अपघात झाला. रस्त्यालगत उभा असलेला डंपर टेम्पो चालकाला दिसला नसल्याने हा अपघात झाला. अपघातात टेम्पोचा चालक उमेश उतेकर (45), सहाय्यर सुयोग पवार (25) दोघेही केबिनमध्ये चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच उलवे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढले. या प्रकरणात उलवे पोलिसांनी डंपर चालकाला नोटीस बजावून सोडले आहे.







