। खालापूर । प्रतिनिधी ।
भरधाव ट्रकने एसटीला जोरदार धडक दिल्याची घटना पाली फाटा येथे सोमवारी (दि. 29) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एसटीचालकासह सात प्रवासी किरकोळ जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटीचालक रवींद्र नित्यानवरे हे अलिबाग ते छत्रपती संभाजीनगर असे पंधरा प्रवासी घेऊन निघाले होते. खोपोली- पेण मार्गावरून जात पाली फाटा येथे ही एसटी आली असता रवींद्र नित्यानवरे यांनी गतिरोधक पाहून एसटीचा वेग कमी केला. मात्र, याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कोळशाच्या ट्रकने या एसटीला जोरदार धडक दिली. या धडकेत एसटी काही फूट पुढे जाऊन समोरून जाणाऱ्या डम्परवर आदळली. या अपघातात चालक रवींद्र नित्यानवरे (56), रंजना पवार (27), लक्ष्मण म्हात्रे (52), संतोष बोचरे (38), इस्माईल खान (54), महेश जयकर (43), दर्शना भरणे (55), काशिनाथ कदम (55) हे जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच हेल्प फाउंडेशन आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना खोपोली नगर परिषदेच्या रुग्णालयात दाखल केले. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून प्राथमिक उपचारानंतर जखमींना सोडण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
भरधाव ट्रकची एसटीला धडक; आठ प्रवासी जखमी
