मुंबई विमानतळावर स्पाइसजेट विमानाचे आपत्कालीन लँडिंग
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई विमानतळावर स्पाईस जेटच्या विमानाचे आपत्कालीन लँडीग करण्यात आले आहे. उड्डाणानंतर या विमानाचे चाक हवेतच निखळले. त्यामुळे या विमानाचे मुंबई विमानतळावर सुखरुप लँडींग करण्यात आले आहे. या विमानातील 75 प्रवासी सुखरुप असून त्यांना विमानतळावर उतरवण्यात यश आले आहे. स्पाईस जेटचे विमान कांडला ते मुंबई असे प्रवास करत असताना हा प्रकार घडला आहे.
स्पाईस जेटचे SG 2906 हे विमान कांडला ते मुंबई येत असताना एक चाक हवेत निखळून पडल्याचे लक्षात आले. विमानाचे एक चाक गायब असल्याचे अधिकाऱ्यांना कळताच त्यांच्यात घबराट पसरली. मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंगसाठी आणीबाणीची घोषणा करण्यात आली. स्पाइसजेटने या घटनेनंतर पहिले निवेदन जारी केले आहे. गुजरातमधील कांडला येथून येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाचे बाहेरील चाक टेकऑफ दरम्यान धावपट्टीवर पडल्याने मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
सुरळीत लँडिंगनंतर या विमानातील 75 प्रवाशांना कोणतीही हानी न होता खाली उतरवण्यात आले. या अपघातानंतर, मुंबई विमानतळावर खबरदारी जाहीर करण्यात आली. काही काळासाठी उड्डाणे थांबवण्यात आली. नंतर धावपट्टी मोकळी झाली आणि सामान्य कामकाज पुन्हा सुरू झाले. या संदर्भात वेळीच लक्षात आल्याने मोठी हानी टळली असल्याचे म्हटले जात आहे.
