रायगड अभ्यास मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

| महाड | वार्ताहर |

गड आणि किल्ले समजून घेतले तरच इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेता येतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची महती समजून घेणे सहज सोपे होते. गड जेवढे समजून घ्यावे तेवढे कमीच. अशाच प्रकारे शिवशंभो प्रतिष्ठान, रोहा संस्थेकडून आयोजित करण्यात आलेली दुर्गदुर्गेश्‍वर रायगड किल्ला अभ्यास मोहीम शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहात अनुभवली. इतिहास अभ्यासकांनी या मोहिमेमध्ये रायगड किल्ल्याचे अनेक पैलू उलगडून दाखवले.

शिवशंभो प्रतिष्ठान रोहा यांनी दोन दिवस आयोजित केलेल्या अभ्यास मोहिमेला मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी तरुण व शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल तेलंगे उपस्थित होते. इतिहास अभ्यासक व अपरिचित माणगाव पुस्तकाचे लेखक रामजी कदम, किल्ले रायगडचे अभ्यासक मोहन फराडे यांनी रायगड व परिसरातील इत्यंभूत माहिती उपस्थितांना दिली. रायगडच्या अष्टबाजूनी असलेल्या टेहळणीच्या चौक्या, शिवकालीन मार्ग, छत्री निजामपूर, गोदाजी जगताप आणि सरकले नाईक यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी कावळाबावळा खिंडीतला रणसंग्राम, रायगड परिसरातील गावांचे शिवपूर्व व शिवकाळ आणि पेशवेकाळातील महत्त्व याबाबतची सविस्तर माहिती रामजी कदम यांनी यावेळी दिली.

तर वाघ बिळाचे महत्त्व, रायगडावरील नाना दरवाजा, महादेवाचा माळ, महादरवाजा, राजवाडा, वेगवेगळे बुरूज, टकमक टोक अशा विविध वास्तूंची माहिती व महत्त्व यावेळी मोहन खराडे यांनी विशद केली. गडावरील नगारखाना असो की टाकसाळ असो, जगदीश्‍वर मंदिर बाजारपेठ व छत्रपती शिवरायांची समाधी या सर्वांचा जिवंत इतिहास मोहन फराडे यांनी शिवप्रेमीं समोर साकारला.

Exit mobile version