सुमारे 34 कोटी रुपयांच्या निधीची गरज
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
प्रत्येक तालुक्यातील खेळाडूंना क्रीडा संकुलाच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून तालुकास्तरावर क्रीडा संकुल उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, अजूनही जिल्ह्यातील काही क्रीडा संकुलांमध्ये सुविधा नसल्याने खेळाडूंची मोठी गैरसोय होत आहे. नव्या क्रीडा संकुलासह इतर सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाकडून सुमारे 34 कोटींहून अधिक रुपयांचा निधी आवश्यक आहे. मात्र, निधीअभावी या संकुलांचा खेळखंडोबा झाला आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी उदयोन्मुख खेळाडूंकडून होत आहे.
अलिबाग तालुक्यातील नेहुली येथे जिल्हा क्रीडा संकुल बांधण्यात आले. हे क्रीडा संकुल समस्यांच्या गर्तेत सापडले असून, त्याठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीची गरज आहे. जिल्हास्तराबरोबर तालुकास्तरावर क्रीडा संकुल उभारण्यासाठी क्रीडा व सेवा संचालयनाने पुढाकार घेतला. त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संकुल बांधण्यासाठी सुरुवातही झाली. पेण, पनवेल, सुधागड, रोहा, माणगाव, श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक कोटी रुपयांमध्ये क्रीडा संकुल बांधून काम पूर्ण झाले. परंतु, त्याठिकाणी इतर सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रत्येकी तीन कोटींप्रमाणे 18 कोटी रुपयांची गरज आहे.
अलिबाग व उरणमध्ये जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. तो प्रश्न सुटला असून, त्याठिकाणी क्रीडा संकुल बांधले जाणार आहे. या क्रीडा संकुलाचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार असून, प्रत्येकी पाच कोटी रुपये अशा दहा कोटी रुपयांच्या निधीची गरज संकुलासाठी असल्याची माहिती क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. म्हसळा व तळा तालुक्यात क्रीडा संकुलाचे काम अपूर्ण आहे. जिल्ह्यातील तालुक्यांमधील क्रीडा संकुलांची अनेक कामे निधीअभावी रखडली आहेत. त्यामध्ये सुसज्ज असे मैदान, दोनशे मीटर धावण्याचे ट्रॅक, संरक्षित भिंत, कबड्डी, खो-खो, कुस्तीसाठी इनडोअर मल्टीपर्पज हॉल, अद्ययावत अशी व्यायामशाळा अशी अनेक कामे केली जाणार आहेत. त्यासाठी सुमारे 34 कोटींहून अधिक रुपयांच्या निधीची गरज लागणार आहे. निधी नसल्याने क्रीडा संकुलामध्ये सोयी सुविधा उपलब्ध करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे खेळाडूंमधूनही नाराजीचे सूर उमटत आहेत.
सुरक्षारक्षकांना फक्त हजार रुपये मानधन
नेहुली येथील क्रीडा संकुलातील मालमत्ता सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. दोन सुरक्षा रक्षकांना फक्त एक हजार रुपये मानधनावर काम करावे लागत आहे. रात्रीच्यावेळी डासांशी सामना करीत सुरक्षा रक्षक आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. तुटपुंज्या मानधनामुळे खासगी सुरक्षा रक्षक मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
पोलादपूर, मुरूडमध्ये जागेचा प्रश्न कायम
जिल्ह्यातील पोलादपूर व मुरूड तालुक्यात क्रीडा संकुल उभारण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासन जागा शोधत आहे. परंतु, अजूनपर्यंत जागा मिळालेली नाही. जागेअभावी या दोन तालुक्यांतील क्रीडा संकुल उभारणीचे काम लांबणीवर गेले आहे. संकुलाच्या जागेचा प्रश्न कायमच असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल उभारण्याच्या हालचाली गेल्या तीन वर्षांपासून सुरु झाल्या. जिल्ह्यातील सहा क्रीडा संकुलांचे काम एक कोटीमध्ये पूर्ण झाले. परंतु, देखभाल दुरुस्तीअभावी अनेक क्रीडा संकुले सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. क्रीडा संकुलांचे संवर्धन करण्यासाठी वर्षाला सुमारे पाच लाख रुपयांचा निधी खर्च केल्यास संकुल चांगल्या स्थितीत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विभागीय क्रीडा संकुलाचे काम लालफितीत
कोकण विभागीय क्रीडा संकुल उभारण्याचा गाजावाजा मागील दोन वर्षांपूर्वी करण्यात आला. माणगावमध्ये जागाही शोधण्यात आली. त्यामुळे शासकीय कर्मचार्यांच्या होणार्या क्रीडा स्पर्धांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळण्याची आशा निर्माण झाली होती. सुमारे 25 एकर जागेत क्रीडा संकुल बांधण्याच्या हालचाल सुरु झाली होती. माती परीक्षणाचे कामही सुरु करण्यात आले होते. संकुलाचा आराखडादेखील करण्यात आला. परंतु, क्रीडा संकुलाच्या या कामाला ब्रेक लागल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या संकुलाचे काम लालफितीत अडकून असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील अनेक क्रीडा संकुलांचे काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी जागेचा प्रश्न होता, तो मार्गी लागला आहे. परंतु, इतर सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यावर तातडीने संबंधित विभागामार्फत कामे केली जातील.
क्रीडा अधिकारी कार्यालय
(नाव न सांगण्याच्या अटीवरून)