तब्बल 6 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी कला, क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास शिबिरात तालुक्यातील 274 शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. तब्बल 6 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेतील विजेते संघ आणि विद्यार्थ्याची निवड जिल्हा स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा परिषद सेस फंड आणि शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून केंद्र स्तरावर आणि नंतर बीट स्तरावर अशा क्रीडा महोत्सव आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व 274 शाळेंच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या क्रीडा स्पर्धेत लंगडी, दोरीवरील उड्या, लगोरी आणि बेचकिने नेम धरणे आदी ग्रामीण खेळांचा समावेश करण्यात आला होता. तर, व्यक्तिमत्व विकासात समूह गीत, माती पासून वस्तू घडविणे, पथनाट्य सादर करणे आणि गीत गायन या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
याआधी तालुक्यातील शाळा 21 केंद्र स्तरावरील स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्यातील विजेते हे चार बीटमधील स्पर्धेत सहभागी झाले. तसेच, बीट स्तरावरून तालुका स्तरावर 50 शाळेतील 600 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. तालुका स्तरावरील क्रीडा स्पर्धा या कडाव येथील गजानन विद्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या. तर, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा कर्जत शहरातील महिला मंडळाच्या विद्या विकास मंदिर शाळेत आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धांचे आयोजन तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड आणि क्रीडा व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे तालुका समन्वय समीर येरुणकर यांच्या नियोजनाखाली करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील केंद्रप्रमुख अरुण पारधी, मोहन पाटील, किशोर पाटील, तसेच तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते. परीक्षक म्हणून नाट्य निर्माते प्रदीप गोगटे, वेदांती गोडबोले, जोशी, अनिल गलगले यांनी कामगिरी पार पाडली.
क्रीडा स्पर्धेचा निकाल
लहान गट प्रथम क्रमांक
बेचकीने नेम धरणेः निकी निरगुडे प्रथम, दोरी उड्या (मुली): गौरी काळन, लंगडी (मुले) सांघिकः गुडवण वाडी शाळा.
मोठा गट प्रथम क्रमांक
बेचकीने नेम धरणेः आकाश पादीर, दोरी उड्या (मुली): ईश्वरी कडाळी, लंगडी (मुले) सांघिकः गुडवणवाडी शाळा.
व्यक्तिमत्व विकास स्पर्धा निकाल
लहान गट प्रथम क्रमांक
सांघिक नृत्यः हालिवली शाळा, पथनाट्यः आसल वाडी शाळा, समूहगीतः कुंडलज शाळा, माती पासून शिल्प बनविणेः गणेश भला.
मोठा गट प्रथम क्रमांक
सांघिक नृत्यः नेरळ कन्या शाळा, समूहगीतः जामरुंग, पथनाट्यः गुडवण वाडी, मातीपासून शिल्प बनविणेः भावना पंडित कोळंबे.






