| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये सर्व संघांसाठी दुखापत हे सर्वात मोठा टेन्शन राहिले आहे. विशेषतः श्रीलंकेचा संघ आपल्या खेळाडूंच्या दुखापतींमुळे खूप अडचणीत आला आहे. या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेने आतापर्यंत फक्त दोनच सामने खेळले आहे आणि त्यांचा एक खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला होता. हा खेळाडू दुसरा कोणी नसून संघाचा कर्णधार दासून शनाका आहे.
मांडीच्या दुखापतीमुळे दासुन शनाका श्रीलंकेच्या संघातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी चमिका करुणारत्नेचा संघात समावेश करण्यात आला आहे. दासून शनाकाला वगळल्याने श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये श्रीलंकेच्या संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत आणि या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. श्रीलंकेला पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
या दोन्ही सामन्यांतील पराभवामुळे त्यांचा संघ सध्या गुणतालिकेत 0 गुण आणि -1.161 च्या निव्वळ धावगतीसह सातव्या स्थानावर आहे. श्रीलंका अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. श्रीलंकेला पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामना जिंकणे त्यांच्यासाठी सोपे नसेल. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ही बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात जखमी झाला होता. एक चेंडू त्याच्या अंगठ्याला लागला त्यामुळे त्याला दुखापत झाली. त्यावेळी विल्यमसन 78 धावांवर दुखापतीने निवृत्त झाला. आता स्कॅन केल्यानंतर केन विल्यमसनच्या अंगठ्याला दुखापत झाल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी त्याच्या पायाला दुखापत झाली होती, त्यामुळे तो अनेक महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता.