माणगावचे बांधकाम रखडले, प्रेक्षक व कलावंतांमध्ये नाराजीचा सूर
| माणगाव | प्रतिनिधी |
दक्षिण रायगडमधील सांस्कृतिक क्षेत्राला उत्तेजन मिळावे तसेच येथे नवनवीन व व्यावसायिक नाटक प्रेक्षकांना पाहता यावीत यासाठी याभागातील नाट्यप्रेमींच्या मागणीचा विचार करून माणगाव नगरपंचायत हद्दीत शासकीय विश्रामगृहासमोर नाट्यगृह मंजूर झाले. त्याला तब्बल सहा वर्षे लोटली तरीही या नाट्यगृहाचे बांधकाम अपूर्ण असल्याने नाट्यगृहावरच प्रश्नचिन्ह उभारले आहे. नाट्यगृहाच्या बांधकामाला पुरेसा निधी मिळाला नसल्याने या बांधकामाचे तीन तेरा वाजले असून, सहा वर्षांनंतर आता वाढीव निधीचे ‘नाट्य’ रंगले आहे. हे बांधकाम रखडल्याने प्रेक्षक व कलावंतांतून नाराजीचा सूर पसरला आहे.
माणगाव नगरपंचायत हद्दीमध्ये नाट्यगृह बांधकाम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून सुमारे चार कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी सहा वर्षांपूर्वीच मिळाली होती. त्यापैकी प्रशाकीय मान्यतेचे अनुषंगाने शासन हिस्याच्या रकमेपैकी 40 टक्के रक्कम ही प्रथम हप्त्याची 1,49,04,088 रुपये वितरीत करण्याबाबत शासन निर्णय पारित करण्यात आला होता. या अनुदानापैकी 14,00,000 रुपये माणगाव नगरपंचायतीकडे 19 जून 2018 रोजी मिळाले होते. तसेच माणगाव नगरपंचायतीकडील स्वहिस्सा रक्कम रुपये 20,00,000 या कार्यालयाकडे एकूण 34,00,000 अनुदान सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले होते. काम जास्त अनुदानाची रक्कम कमी मिळत असल्याने बांधकाम करण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्याचबरोबर सहा वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या नाट्यगृहाचे इमारतीच्या अंदाजपत्रकात जो निधी मंजूर केला, त्या निधीत हे नाट्यगृह उभारू शकत नाही. सध्या शासनाकडून 1 कोटी 35 लाख रुपये सार्वजनिक बांधकाम खात्याकडे माणगाव नगरपंचायतीने निधी वर्ग केला. सध्या या इमारतीचा पाया भरून पीसीसी करण्यात आले आहे. मात्र, निधी वेळेवर मिळाला नसल्याने या बांधकामाला साडेसातीच लागली आहे. सहा वर्षांपूर्वी हे नाट्यगृह मंजूर झाले. त्यानंतर आता बराच कालावधी गेल्याने सर्वच बांधकाम साहित्याचे दर कित्येक पटीने वाढले आहेत. तसेच मजुरीही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नाट्यगृह बांधकामाला हा निधी अपुरा पडत आहे. त्यामुळे नाट्यगृहाच्या बांधकामाचा तिढा कायम राहणार आहे.
.. तर नाट्यसंस्कृतीला चालना मिळेल
नाट्यगृह बांधकामासाठी लागणारा पुरेसा निधीही वेळोवेळी शासनाकडून उपलब्ध करून दिल्यास माणगावच्या नाट्यसंस्कृतीला चालना मिळेल. सध्या पनवेल, रोहा, महाड येथे नाट्यगृह आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, येथे नाट्यगृह आहेत. माणगावचे नाट्यगृह 500 बैठक आसन क्षमतेचे असल्याने तिकिटाचा दर आयोजकांना पर्यायानी वाढवावा लागणार असून, हा खर्च उभा करण्यासाठी रसिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या नाट्यगृहाची आसन क्षमता वाढवून 700 किंवा 1000 केल्यास या नाट्यगृहात लहान-मोठे कार्यक्रम व दर्जेदार नाटक ठेवणे सोयीस्कर होईल.
उभारणी कागदावरच
नगरपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या अजिंठ्यावर नाट्यगृह उभारणीचा मुद्दा प्रचारात वापरला गेला, मात्र हे काम अर्धवट राहिल्याने नाट्यगृह उभारणी कागदावरच राहिली आहे. या नाट्यगृहाची बाल्कणी वाढवून किमान 700 प्रेक्षक क्षमता केल्यास आयोजकांना दर्जेदार नाटके आणणे परवडेल अन्यथा हे नाट्यगृह सभा संमेलनासाठीच उपयुक्त ठरणार असल्याची चर्चा नाट्य रसिकांत सुरू आहे.