शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
| रेवदंडा | प्रतिनिधी |
अध्यात्मिक गुरू श्री सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दी सोहळा महोत्सव मोठया उत्साहात व भक्तीमय वातावरणात नागाव खारगल्ली येथील साईनगरमध्ये प्रशांती निवास धोबन तळा येथे साजरा करण्यात आला.
खारगल्ली साईनगर येथील प्रशांती निवास येथे श्री सत्यसाईबाबा जन्मशताब्दी सोहळा महोत्सव निमित्त पंचक्रोशीतील गरजू नागरिकांना श्री साई नेत्रालय या ओपिडी युनिटचा उद्घाटन सोहळा आयोजीत करण्यात आला होता. या प्रसंगी माजी विधानपरिषद आमदार जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थितीसह नागाव ग्रा.प.माजी सरपंच नंदु मयेकर, नागाव ग्रा.प.सरपंच हर्षदा मयेकर, शरद वरसोलकर, सुरेश खोत, निलेश खोत, बाळू नवखारकर, कैलाश गावडे, शिवराम पटेल, संदिप नाईक, रामदास कोल्हे, अशोकराव सोनावणे, अंबादास कोल्हे, वैभव वाघ, किशोर येरमे, भास्कर कोल्हे, तसेच डॉ.अरूण गवळी, डॉ. अरविंद आठवले आदी मान्यवर मंडळीची उपस्थित होते. प्रसंगी माजी आमदार जयंत पाटील यांच्या शुभहस्ते श्री साई नेत्रालय या ओपिडी युनिटचे उद्घाटन करण्यात आले. या श्री साई नेत्रालय या ओपिडी युनिटद्वारे मोफत नेत्र संबधीत सर्व उपचार, तसेच मोती बिंदू, काच बिंदूचे मोफत ऑपरेशन सुध्दा कसलेही शुल्क न आकारता करण्यात येईल असे जाहीर आयोजकाचे वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी मोठया संख्येने श्री सत्यसाई भक्तमंडळी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुरूवातीस माजी आमदार जयंत पाटील यांनी श्री सत्यसाईचे दर्शनाला लाभ घेतला. तर श्री सत्यसाई सेवक सुरेश मेहेर यांनी उपस्थित मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
खारगल्ली प्रशांती निवास येथे श्री सत्यसाईबाबा जन्म शताब्दी निमित्त ओंकारम सुप्रभातम, ईश्वर किर्तन, भजन व आरतीनंतर दर्शन सोहळा, प्रसाद वितरण व चहा कॉफी, कल्चर प्रोग्राम, नेत्रालय ओपीडी युनिटचे उद्घाटन, अल्पोपहार व चहा, येथे फळे व बिस्किट पॅकेट वाटप, नारायण सेवा अंतर्गत नंतर नारायण सेवा निमित्त अलिबाग सिव्हील रूग्णालय व श्री समर्थ वुध्दाश्रम परहूर पाडा येथे अन्नदान, थेरोंडा गणपतीपाडा येथे कार्यक्रम, थेरोंडा येथे भजन व जन्म शताब्दी महोत्सव सोहळा आयोजीत केला होता.
