। अलिबाग । वार्ताहर ।
पेझारी येथील श्रीदत्त मंदिरात श्रीपंत भक्त मंडळातर्फे गुरुवारी (दि.18) मध्यरात्री श्रीपंत जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त दुपारी 4 वाजता श्रीपंत गुरूचरित्र पोथी पारायण सोहळ्याच्या शेवटच्या सत्राला सुरुवात होईल. सायंकाळी 7 वाजता श्रीपंत पोथीतील अध्याय क्र. 54 वाचून गेले 7 दिवस सुरु असणार्या श्रीपंत गुरूचरित्र पोथी पारायण सप्ताहाची सांगता होईल. सायंकाळी 7.15 वाजता भक्तीचीये पोटी, बोध काकडे ज्योती व आरती अवधूता या आरत्यांनी पोथी पारायण सप्ताह समाप्त होईल.
रात्री 10.30 वाजता दत्तगुरू माऊली, माय माझी दत्तात्रय माउली या पदाने श्रीपंत जन्मोत्सवाच्या मुख्य भजनसोहळ्यास सुरूवात होईल. मध्यरात्री 12 वाजता दत्त नामाच्या गजरात श्रीपंत जन्मोत्सव व श्रीपंत जन्माचा पाळणा होईल. मध्यरात्री 12.30 वाजता दत्तात्रया ओवाळू तुज आरती ने श्रीपंत जन्मोत्सवाची सांगता होईल असे श्रीपंत भक्त मंडळ पेझारीचे अध्यक्ष दिगंबर राणे यांनी सांगितले आहे.