शासनाकडून 75 लाखांचे बक्षीस जाहीर
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
पर्यावरण व वातावरण बदल विभागाने पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतनकरून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेले ‘माझी वसुंधरा अभियान 4.0’मध्ये श्रीवर्धन नगरपरिषदने सहभाग घेतला होता. माझी वसुंधरा अभियानातील सर्वोत्कृष्ठ कामगिरी केलेल्या नगरपरिषदांचा दि. 27 सप्टेंबर रोजी निकाल जाहीर झाला असून श्रीवर्धन नगरपरिषदेने महाराष्ट्र राज्यात 13 वा क्रमांक पटकावला आहे. तसेच, 15 हजार ते 25 हजार या लोकसंख्येच्या प्रवर्गामध्ये कोकण विभागात पहिला क्रमांक पटकाविला असून शासनाकडून तब्बल रु. 75 लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. लवकरच महाराष्ट्र शासन स्तरावर सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि रक्कम बक्षीस स्वरूपात वितरीत केली जाणार आहे.
माझी वसुंधरा अभियान हे दरवर्षी संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. याअंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या पंचमहाभूतांच्या आधारे विविध घटकांची तपासणी केली जाते. यात शहरात एकूण राबविण्यात आलेले वृक्षारोपण व पूर्वी लावण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन, तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात तयार होणार्या सेंद्रिय खतास ‘हरित महासिटी कंपोस्ट’ हा शासनाचा नोंदणीकृत ब्रँड प्राप्त असणे, सौरउर्जा प्रकल्प, शहरातील सुशोभीकरण आणि हरित क्षेत्रांची, जल स्त्रोतांची निगा राखणे अशा नानाविध उपक्रमांची तपासणी शासनामार्फत त्रयस्थ संस्थेद्वारे केली जाते. तसेच, शहरातील नागरिकांकडून सर्वेक्षण दरम्यान प्रतिक्रिया घेण्यात आल्या होत्या.
गेल्यावर्षी माझी वसुंधरा अभियान सर्वेक्षणात श्रीवर्धन शहराला कोकण विभागातून दुसरे मानांकन मिळाल्याने यशाने थोडक्यात हुलकावणी दिली होती. परंतु, अथक प्रयत्न व सातत्यातून नगरपरिषदेने यावर्षी प्रथम क्रमांक पटकावून मागील कसूर भरून काढली आहे. श्रीवर्धन नगरपरिषदेची माझी वसुंधरा अभियानातील ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीवर्धन आता स्वच्छतेच्या कामगिरीत देखील अग्रेसर झाल्याचे दिसून येत आहे. याचप्रमाणे मा. मुख्याधिकारी विराज लबडे यांच्या कल्पनेतून श्रीवर्धन शहरामध्ये नगरपरिषदेने शहर सौंदर्यीकरण अंतर्गत विविध ठिकाणी काम केल्याचे दिसून येत आहे.
या सर्वेक्षणात संपूर्ण राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायती सहभागी झालेले होते. या अभियानात श्रीवर्धन नगर परिषदेने उच्चतम कामगिरी केलेली आहे. यासाठी नगर परिषदेच्यावतीने मुख्याधिकारी विराज लबडे यांनी या अभियानासाठी नेमणूक करण्यात आलेल्या समग्र कन्सल्टनसी, सर्व नागरिक, नप कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचे स्वच्छता ठेकेदाराकडील कर्मचारी वर्गाचे देखील अभिनंदन केले आहे.