। दिघी । वार्ताहर ।
उच्च रक्तदाब, मधुमेह आदींमुळे होणार्या मूत्रपिंड विकारांची रुग्ण संख्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढली आहे. या आजाराचे वाढते प्रमाण बघता उपचार म्हणून डायलिसिस सुविधा रायगडमधील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये चार नवीन डायलिसिस केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा जोरदार झाली. मात्र, ही घोषणा हवेतच विरल्याने श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यातील रुग्णांचे प्रचंड हाल होत असून उपचाराविना जीव धोक्यात आला आहे.
किडनी निकामी झाल्याने शरीरातील रक्त शुद्धीकरण प्रक्रिया बंद होते. त्यामुळे यावर उपचार म्हणून रुग्णांना किडनी बदलणे किंवा डायलिसिसद्वारे रक्तशुद्धीकरण करणे आवश्यक असते. किडनी बदलण्यासाठी एकाच वेळी बराच खर्च लागत असल्याने अनेक रुग्ण डायलिसिसचा पर्याय निवडतात. त्यासाठी जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेल्या डायलिसिस सुविधेसाठी रायगडमधील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये चार नवीन डायलिसिस केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा झाली. मात्र, त्यापैकी श्रीवर्धन आणि रोहा येथे केंद्र सुरू न झाल्याने डायलिसिस रुग्णांची चांगलीच परवड होत आहे.
जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन, रोहा, पेण तसेच कर्जत याठिकाणी महाविकास आघाडीचे सरकार असताना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून प्रत्येकी एक केंद्र आणि त्याठिकाणी प्रत्येकी दोन डायलसिस मशिन व आरओ प्लँट बसविण्यात येणार होते. माणगाव व पेण येथे केंद्र सुरू झाली. मात्र रोहा व श्रीवर्धन तालुक्यातील रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी प्रवासाची दगदग आणि अधिकची पदरमोड करत रुग्णालयात पोहोचल्यावर आधीच्याच रुग्णांची प्रतीक्षा यादी मोठी असल्याने नंबर कधी लागणार, अशी स्थिती आहे. प्रतीक्षा यादीमुळे अनेक नव्या रुग्णांना डायलिसिसचा लाभ घेता येत नसल्याने दिवसेंदिवस याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो.
मूत्रपिंड विकाराची श्रीवर्धन व म्हसळ्यात रुग्ण आहेत. मात्र, सोय नसल्याने खासगी रुग्णालयात डायलिसिस करावे लागत आहे. उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस हे मोफत होत असल्याने अनेक गरीब रुग्णांना त्याचा जगण्यासाठी फायदा होतो. मात्र खासगी केंद्रात त्याची फी चौदाशे आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना आठवड्यातून तीनदा डायलिसिस करणे परवडत नाही. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिससाठी 9 रुग्ण उपचार घेतात. तर तब्बल 22 जण अद्यापही आपला नंबर कधी येईल, याची वाट पाहत खासगी केंद्रांत डायलिसिससाठी जात आहेत. रुग्णांना सेवा देण्यासाठी माणगाव येथे दोन तंत्रज्ञ ठेवण्याची तसेच श्रीवर्धन व रोहा येथे लवकरात लवकर डायलिसिस केंद्र व्हावे, अशी मागणी होत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना संपर्क केला असता ते बैठकीत असल्याचे सांगितले.