। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।
सिंधुदुर्गमध्ये एका एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. समोरून वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादामध्ये बस ओहोळात पलटी झाली. या अपघातात नऊ जण जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विजापूरवरून कोल्हापूरमार्गे कुडाळ या दिशेने जात असलेल्या वैभववाडी तालुक्यातील कसूर गावामध्ये बसचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 25) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. ही बस कोल्हापूरमार्गे भुईबावडा घाट उतरून कुसुर पिंपळवाडी येथे पळसुळे नर्सरीजवळ आली. त्याचवेळी वैभववाडीकडून उंबर्डेच्या दिशेने जाणारा मोटारसायकलस्वार एसटी समोर अचानक आडवा आल्यामुळे त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या साईड पट्टीवर उतरली. मात्र साईडपट्टी मजबूत नसल्यामुळे बस जवळ असलेल्या ओहोळात पलटी झाली. या बसमधून 32 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी नऊ प्रवाशांना किरकोळ दुःखापत झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बसच्या मागच्या बाजूच्या काचा फोडून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. तसेच, जखमी प्रवाशांना ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे दाखल करण्यात आले आहे.