42 प्रवाशांचे प्राण कंठाशी
। पाली/ बेणसे । प्रतिनिधी ।
सुधागड तालुक्यातील पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर या रस्त्याची दुरवस्था किती गंभीर बनली आहे, याचा प्रत्यय शुक्रवारी (दि. 3) एका थरारक घटनेतून आला. पाली येथून 42 प्रवाशांना घेऊन पाच्छापूरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस रस्त्यावरील मोठे खड्डे आणि चिखलामुळे रस्त्याच्या कडेला घसरून कलंडली. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बस पलटी होण्यापासून वाचली आणि सर्व 42 प्रवासी सुखरूप बचावले.
पाली आगारातून दुपारी 12.45 वाजता सुटलेली पाली–पाच्छापूर–दर्यागाव ही एसटी बस (क्रमांक MH-20 BL-3097) नेहमीप्रमाणे प्रवाशांना घेऊन पाच्छापूरकडे जात होती. दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास पाच्छापूर गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात बस गेल्याने आणि चिखलामुळे नियंत्रण सुटले. बस रस्त्याच्या कडेला घसरून एका बाजूला धोकादायकरित्या कलंडली. बस पलटी होणार असल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. मात्र, चालकाने शांतपणे आणि धाडसाने वाहनावर नियंत्रण मिळवत बस थांबवली. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी प्रवाशांनी मोठा धक्का बसल्याचे सांगितले.
चंद्रावरील पिकनिक
विशेष म्हणजे, याच खराब रस्त्याविरोधात पाच्छापूर भागातील 9 गावांतील ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आगामी 5 जुलै रोजी 'चंद्रावर पिकनिकला चला' या अनोख्या आणि उपहासात्मक सहलीची घोषणा केली आहे. ही सहल होण्यापूर्वीच आज घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे.
