महागाव मार्गावर एसटी बसची पिकअप टेम्पोला धडक

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

। सुधागड-पाली । वार्ताहर ।

सुधागड तालुक्यातील महागाव येथे ताडगाव ते घोडगाव मार्गावर शुक्रवारी (दि.18) सकाळी एसटी बसची पिकअप टेम्पोला धडक लागून अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पिकअप टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून एसटी बसचेदेखील पुढील एका बाजूचे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एसटी बसचालक योगेंद्र पाटील हे खेमवाडीवरून पेणकडे एसटी बस घेऊन जात होते. दरम्यान उतारावर एसटी बसचा ब्रेक न लागल्याने एसटी बस समोरून येणाऱ्या पिकअप टेम्पोला धडकली. टेम्पोचालक मारुती निरगुडा हे पिकअप टेम्पो चालवत होते. बसच्या धडकेने पिकअप टेम्पो रस्त्याच्या बाजूला उतारावर अडकला, अन्यथा दरीत कोसळला असता. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

परिवहन महामंडळाच्या गाड्यांची झालेली दुरवस्था व देखभाल दुरुस्तीचा अभाव हे अपघातांना निमंत्रण देतात. त्यामुळे किमान दुर्गम भागाकडे जाणाऱ्या एसटी बसेस चांगल्या सुस्थितीत असलेल्या सोडाव्यात, असे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन साठे यांनी सांगितले. सदर अपघाताचा पंचनामा पोलीस सब इन्स्पेक्टर आर. एम. पवार यांनी केला.

Exit mobile version