लालपरी धावणार सुसाट

एसटीची बससेवा होणार अधिक सक्षम

। रायगड । प्रतिनिधी ।

राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या ताफ्यात दोन वर्षांत 5,250 इलेक्ट्रिक बससह 11,260 बस गाड्यांची भर पडणार आहे. यापैकी काही गाड्या एसटीच्या ताफ्यात येण्यास सुरुवात झाली आहे. तर, उर्वरित गाड्या लवकरच येणार आहेत. यामुळे मुंबईसह राज्यातील एसटीची बससेवा अधिक सक्षम होणार आहे. राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या 14 हजार बस आहेत. त्यापूर्वी एसटीच्या ताफ्यात 18 हजार बसगाड्या होत्या; मात्र मागील तीन वर्षांत नवीन बसगाड्या खरेदी करण्यात आलेल्या नाहीत.

आयुर्मान संपुष्टात आलेल्या बसगाड्या भंगारात काढण्यात येत असल्याने ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी झाली आहे. येत्या काही दिवसांत आणखी दोन हजार गाड्या भंगारात काढण्यात येणार आहेत. त्यामुळे महामंडळाने आपल्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.महामंडळाने इलेक्ट्रिक बससोबत साध्या गाड्या वाढण्यावर भर दिला आहे. टप्प्याटप्प्याने राज्यात 5,150 इलेक्ट्रिक बस येणार आहेत. त्यापैकी 60 बस एसटी ताफ्यात दाखल झाल्या आहेत. ई-शिवनेरीच्या 100 बसपैकी 86 बस ताफ्यात आल्या असून उर्वरित बस काही दिवसांत येणार आहेत. तसेच, डिझेलवर चालणार्‍या सहा हजार गाड्या येणार आहेत. यातील 2,200 बसची वर्कऑर्डर झाली. टप्प्याने बस ताफ्यात येणार आहेत. याशिवाय 2,500 बस खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. 1,310 साध्या बस खासगी भाड्याने घेणार असून याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून डिसेंबर अखेरपर्यंत गाड्या एसटीच्या ताफ्यात येणार आहेत.

दोन वर्षांत 11,260 गाड्या येणार
5,150 इलेक्ट्रिक बसपैकी 60 बस आल्या
ई-शिवनेरी 100 पैकी 86 बस आल्या
दर महिन्याला सध्या बस 300 येणार
2,500 बस निविदा प्रक्रिया सुरू होणार
1,310 साध्या बस खासगी भाड्याने घेणार

एसटीच्या ताफ्यात नवीन गाड्या आल्यानंतर शहरांसह गावखेड्यांतील बससेवेला गती मिळणार आहे. कोरोनापूर्व 65 लाख प्रवासी संख्या होती. नवीन गाड्या आल्यानंतर तो आकडा गाठणे सोपे होईल.

– अभिजित भोसले,
जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ

Exit mobile version