| चिरनेर | प्रतिनिधी |
उरणचा एसटी बस डेपो सध्या अवैध प्रवासी वाहतूक, रेल्वे प्रवासी वाहतुकीच्या विळख्यात सापडला आहे. यामध्ये सुमारे 50 कर्मचाऱ्यांची कमतरता, भंगार बसेसच्या उपलब्धतेवर अवलंबून असणारा तसेच दुहेरी प्रवासी वाहतुकीमुळे उरण एसटी डेपो सध्या पुरेशा प्रवाशांअभावी तोट्यात आला आहे.
चार हेक्टर क्षेत्रावर कार्यरत असलेल्या एसटी बस डेपो मधून विविध मार्गवर दररोज 47 बस धावतात. यापैकी 35 बस जुन्या आहेत. त्यात पाच ते सहा गाड्या लवकरच भंगारात जाणार आहेत. यामुळे डेपोला काही महिन्यात नवीन गाड्यांची व्यवस्था करावी लागणार आहे. या डेपोतून बस 43 शेड्युलमध्ये 262 फेऱ्या आणि सुमारे 13000 प्रवासी वाहतूक केली जात आहे. आगारात सध्या वाहन चालक 33, मेकॅनिक 12 स्वच्छता कामगार 2 आदी मिळून 50 कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा अतिरिक्त ताण मात्र डेपोच्या कामकाजावर पडत आहे. प्रवाशांची गैरसोय होणार नाही. याची दक्षता घेऊन नियोजित वेळेत गाड्या सोडण्याला अधिक प्राधान्य देण्यावरच अधिक भर दिला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ओव्हर टाईम मध्ये अतिरिक्त काम करून घ्यावे लागते.
निवारा शेडअभावी प्रवाशांची गैरसोय
उरण परिसरात नवी मुंबई परिवहन सेवेच्या एनएमएमटी बस प्रवाशांची वाहतूक करीत आहे. 30 व 31 या दोन मार्गा वरून दररोज सुमारे दीड ते दोन हजार प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. मात्र, चार फाटा ओएनजीसी रोडलगतच एनएमएमटी बससाठी अखेरचा थांबा आहे. या बस शहरातील पेन्शरन्स पार्कपर्यंत प्रवाशांची वाहतूक केली जाते. मात्र, या ठिकाणी निवारा शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते.
योगेश केडूस्कर,
एनएमएमटी व प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी निवारा थांबा उभारण्याची मागणी सातत्याने उरण नगर परिषदेकडे करण्यात आली आहे. मात्र, मागणीकडे सातत्याने कानाडोळा केला जात आहे.
एनएमएमटीचे व्यवस्थापक
एसटी बस डेपोजवळच असलेल्या चार फाटा येथून खासगी गाड्या, रिक्षा, इको गाड्यातून मोठ्या संख्येने अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. याबाबत अनेक तक्रारींनंतरही वाहतूक शाखेकडून कोणतीही ठोस कारवाई केली झालेली नाही. त्यामुळे डेपो तोट्यात आला आहे.
तुषार गद्रे,
आगार व्यवस्थापक, उरण
