एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाची हाक

| रोहा | प्रतिनिधी |

रोहा आगार व्यवस्थापक प्रकाश शेलार यांच्या मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या माध्यमातून रोहा आगारातील कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषणाचा हत्यार उपसले आहे. गुरुवार दि.26 नोव्हेंबरपासून साखळी उपोषणाला बसणार असल्याची माहिती कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास खोपरे यांनी दिली.

रोहा आगारातील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून, आगार व्यवस्थापक प्रकाश शेलार यांच्याकडून कर्मचाऱ्यांशी अयोग्य वागणूक देत मानसिक त्रास दिले जात आहे. कामाच्या वेळापत्रकातील अनियमितता, रजा नाकारणे, अतिरिक्त कामाचा बोजा, वेतन कपातीविषयी धमक्या देणे तसेच साप्ताहिक सुट्ट्या न देणे, अशा विविध तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत. या समस्यांबाबत संघटनेने आगार प्रशासना व संबधित विभागीय अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊन पाठपुरावा केला; मात्र, अद्याप कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर समाधानकारक तोडगा न निघाल्याने जोपर्यंत हुकूमशाह आगार व्यवस्थापकाची बदली होत नाही, तो पर्यंत संघटनेचे सभासद साखळी उपोषण सुरू ठेवतील, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. दि.20 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सभेत साखळी उपोषणाचा ठराव पारित करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास खोपरे, जिल्हा सचिव संतोष म्हात्रे, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप जगताप, आगार अध्यक्ष अजय जाधव, आगार सचिव बलराम जोशी, माजी विभागीय सचिव गणेश शेलार आदी प्रमुख पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version