| मुंबई | प्रतिनिधी |
दीर्घकाळानंतर एसटी कर्मचार्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत एसटी कर्मचार्यांना सरसकट पाच हजार रुपये वेतनवाढ द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले. मागण्या मान्य न झाल्यास 9 ऑगस्टपासून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला.
विलीनीकर मागणीसाठी गुणवंत सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांपूर्वी सहा महिने एसटी कर्मचार्यांनी आंदोलन केले. तेव्हा विलीनीकरणाची मागणी चुकीचा असल्याचे सांगण्यात येत होते. विलीनीकरणाऐवजी शासनाने वेतनवाढ दिली. तरीही सदावर्ते यांनी कर्मचार्यांचे आंदोलन रेटले. एसटीच्या तत्कालीन संघटनांचा प्रभाव या आंदोलनाने कमी केला. दरम्यान, सदावर्तेना बाजूला करून एसटी कर्मचार्यांच्या 9 संघटनांनी कर्मचारी हिताच्या मागण्यांसाठी मुंबईत धरणे आंदोलन सुरू केले. 90 हजार कर्मचार्यांच्या कुटुंबातील प्रत्येकी चार मतदार धरले तरी साडे तीन ते चार लाख मतदारांची नाराजी सत्ताधार्यांना ओढावून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सरकारला एसटी कर्मचार्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील. अन्यथा, संप झाल्यास राज्यभरातील लाखो प्रवाशांचा प्रवासाला काही काळ ब्रेक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.