फेऱ्या बंद केल्याने ग्रामीण प्रवाशांचे हाल
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून विशेष जादा बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागसह आठ आगारांतून तब्बल 82 हून अधिक जादा बसेस सोडण्यात येणार असून, राज्यभरात एकूण 452 पेक्षा अधिक विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, या जादा बसेसच्या नियोजनासाठी ग्रामीण भागातील नियमित फेऱ्या बंद करण्यात आल्याने गावे, वाड्यांमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याची तक्रार पुढे येत आहे.
शाळा आणि महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी लागल्यानंतर अनेक नागरिक कोकणासह आपल्या मूळ गावी जाण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे एसटी स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊन एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या बससेवा वाढविल्या आहेत. बस बुकिंगसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, प्रवाशांच्या गर्दीनुसार अतिरिक्त बसेस सोडण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
नंदुरबार, अहमदपूर, जामनेर, तुळजापूर, अक्कलकोट, गोंदावले, माजलगाव, शेगाव, लातूर, जेजुरी, मुंबई, नालासोपारा, पनवेल, पंढरपूर आणि बोरीवली या मार्गांवर विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच अलिबाग-पनवेल, पेण-पनवेल, श्रीवर्धन-माणगाव आणि महाड-पनवेल या मार्गांवरही विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. मात्र, दुसरीकडे, ग्रामीण भागातील अनेक नियमित फेऱ्या बंद करण्यात आल्याने नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. “प्रवासी संख्या कमी आहे” हे कारण देत काही मार्गांवरील फेऱ्या कमी केल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जादा उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने नियमित प्रवाशांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, विभाग नियंत्रकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बंद केलेल्या फेऱ्या तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अलिबाग आगाराचा मनमानी कारभार?
राज्य शासनाच्या महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना एसटी प्रवासात अर्ध तिकीट सवलत देण्यात आली आहे. या योजनेमुळे एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, अनेक महिला दररोज रोजगारासाठी एसटीने प्रवास करत आहेत. नागाव, चौल, रेवदंडा आणि परिसरातील हजारो महिला नोकरी व व्यवसायासाठी नियमितपणे प्रवास करतात. मात्र काही बस फेऱ्या बंद करण्यात आल्याने त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अलिबाग आगारातून सकाळी सव्वा आठ वाजता सुटणारी अलिबाग-महाजने बससेवा बंद करण्यात आल्याचा फटका विशेषतः वावे ते अलिबाग दरम्यान प्रवास करणाऱ्या महिलांना बसत आहे. वावे ते नागाव या मार्गावर स्वतंत्र एसटी बस सुरू करण्याची मागणी अनेक वेळा करूनही आगार प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये सुरू आहे.







