श्रीवर्धन शहरातील एसटी फेरी बंद

प्रवाशांना भुर्दंड

। श्रीवर्धन । वार्ताहर ।

श्रीवर्धनचे एस.टी.बस स्थानक गावाबाहेर असल्यामुळे तेथे रिक्षाने ये-जा करण्यासाठी प्रवाशांना 60-70 रुपये मोजावे लागतात. हा भुर्दंड प्रवाशांना पडू नये या हेतुने बर्‍याच वर्षांपूर्वीपासून सकाळी 7 च्या आधी व सायंकाळी 7 नंतरच्या लांब पल्ल्याच्या काही गाड्यांना श्रीवर्धन शहरातून एक विशिष्ट फेरी ठेवण्यात आली आहे. सकाळी सुटणार्‍या मुंबई, लातूर, अलिबाग, बीड, सातारा व अन्य काही गाड्यांना श्रीवर्धन गावातून राऊंड ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांची मोठी सोय होते. परंतु अलिकडे अनेक वेळा सायंकाळी येणार्‍या लातूर-श्रीवर्धन, बीड-श्रीवर्धन, मुंबई-श्रीवर्धन व अन्य काही बसच्या फेरींचे तिकीट प्रवाशांनी काढलेले असता चालक-वाहक गावात एसटी नेत नाहीत. अशावेळी चालक-वाहकांनी एसटी गावात नेण्यास नकार दिला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी व त्यांनी प्रवाशांना गावात जाण्याचे रिक्षा भाडे द्यावे, असे नागरिकांचे रास्त म्हणणे आहे.

तरी आगार व्यवस्थापकांनी ही बाब गांभीर्याने घेऊन ज्या गाड्यांची फेरी आहे त्या गावात नेण्यास चालक-वाहकांना बंधनकारक करावे व नकार देणार्‍या चालक-वाहकांवर त्यावेळी कडक कारवाई करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

Exit mobile version