एसटीचे वेळापत्रक बेभरवशाचे; प्रवाशांचा खोळंबा

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

कोकणातून मुंबईकडे तर मुंबईतून कोकणाकडे धावणार्‍या महामंडळाच्या प्रवासी एसटी बस सुविधा सेवा बेभरवशाच्या झाल्या आहेत. कोणतीच एसटी बस वेळेवर मिळत नसल्याने महाडकडून मुंबईकडे जाणारे व मुंबई पनवेलकडून महाडकडे प्रवास करणारे प्रवासी अक्षरशः संतापले आहेत. दीड-दोन तासाने एखादी बस आली रे आली की एकच झुंबड होत आहे. तर तीच अवस्था पनवेल बसस्थानकात प्रवाशांची, तसेच पनवेलहून नागोठणे, कोलाड, इंदापूर, माणगाव, महाड प्रवाशांची होत आहे.

मुंबईहुन कोकणाकडे व कोकणाकडून मुबंईकडे धावणार्‍या एसटी महामंडळाच्या बसचा वेळापत्रक बेभरवशाचा झाला आहे. त्यामुळे पहाटेच्या धावणार्‍या एसटी बसची सेवा ही प्रवासी वर्गाला वेळेवर मिळत नसल्याने महाड, माणगाव, इंदापूर, कोलाड, नागोठणेकडून पेण, पनवेल, मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांची सर्व स्थानकात मोठी गर्दी पहायला मिळत आहे. एसटीची सुविधा वेळेवर मिळत नसल्याने कामावर जाणारे कामगार तसेच उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी तर काही प्रवास करणारे प्रवाशांना आपापल्या वेळेवर पोहचता येत नाही तर तर चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतर प्रवास करण्यास दोन तास मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे विद्यार्थी वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे. रस्त्यावर व स्थानकात तासन्तास उभे ताटकळत बसलेले प्रवासी हे अक्षरशः मेटाकुटीस येतात, तर काही तासांनी बस येते तीही फुल्ल असते, त्यामुळे येणार्‍या बसवर एकच झुंबड उडते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत.

काही दिवसांवर आता दिवाळी येऊन ठेपली असून, या सेवा अशाच प्रकारे सुरू राहिली तर प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण पसरेल. एसटी महामंडळाच्या बस वेळेवर येणे गरजेचे असून, त्यासाठी महामंडळाने नियोजन करावे.

अनिल महाडिक
सामाजिक कार्यकर्ते कोलाड
Exit mobile version