राष्ट्रीय महामार्गावरील टोलमुळे महिना दीड लाखाचा बोजा
। सांगोला । प्रतिनिधी ।
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील काम पूर्ण झाले असल्यामुळे अनकढाळ पाटी येथे टोल सुरू करण्यात आला आहे. यामुळे घायकुतीला आलेल्या एसटी महामंडळाला टोलच्या खर्चाचा ‘ओव्हरलोड’ सहन करावा लागणार आहे. ग्रामीण भागात विद्यार्थी, प्रवासी वाहतूक करणार्या एसटी महामंडळ बसच्या 32 फेर्यांना दररोज सुमारे साडेपाच हजार रुपये इतका टोल भरावा लागणार आहे.
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून कोरोनामुळे राज्यातील एसटी महामंडळ तोट्यात आहे. एसटी बस धावणार्या अनेक मार्गांवर कधीकधी अपेक्षित प्रवासीही मिळत नसल्याने काही मार्गावर एसटी बसेस बंद कराव्या लागत आहेत. तर, काही मार्गावर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बसेस सुरू आहेत, त्यामुळे बसेस व कर्मचार्यांचा पगार आणि उत्पन्न याचा ताळमेळ लागेना.
सांगोला आगारातून आटपाडी, कोंबडवाडी, ढालगाव, सातारा, कोल्हापूर या मार्गांवर दररोज एसटीच्या 32 फेर्या होतात. विशेषतः कोल्हापूर वगळता ग्रामीण भागातील आटपाडी, नागज, ढालगाव, कोंबडवाडी या मार्गांवर धावणार्या दररोज 22 फेर्या होतात. यातील अनेक गाड्या मुक्कामी आहेत. या मार्गांवरील सर्वच एसटी बसला प्रत्येकी एक फेरीसाठी 245 रुपये पथकर भरावा लागतो, तर 22 फेर्यांसाठी दररोज 5 हजार 390 रुपये टोलसाठी भरावे लागणार आहेत. सांगोला एसटी आगाराकडून मासिक 1 लाख 61 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे केवळ टोलसाठी मोजावे लागणार आहेत.
खासगी वाहतूक वाढल्याने व दुचाकींचा वापर वाढल्याने एस.टीचा प्रवासी वर्ग कमी झाला आहे. त्यामुळे एसटीचे उत्पन्नही कमी झाले आहे. त्यास भरीसभर म्हणून आता टोलचा खर्च वाढला आहे. वास्तविक पाहता, शासकीय विविध सवलती देणार्या महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेसना टोलमधून सवलत मिळणे अपेक्षित आहे. जेवढ्या किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचा वापर बसेस करतात, तेवढाच पथकर आकाराने गरजेचे आहे, नाहीतर डिझेल खर्च, वाहक-चालक आणि बसेसची देखरेख यांचा खर्च पाहता टोलमुळे ‘चार अण्यासाठी बारा अणे’ खर्च होणार आहेत.
प्रवास 18 कि.मी., टोल मात्र 60 कि.मी.चा
आटपाडी, कोंबडवाडी, नागज, ढालगाव या मार्गावर धावणार्या एसटी बस रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गाचा वापर फक्त 18 किलोमीटरपेक्षा कमी करतात; परंतु टोल मात्र 60 किलोमीटरचा पूर्ण भरावा लागणार आहे. उत्पन्न चार अणे आणि टोल बारा अणे अशी अवस्था सांगोला आगाराची झाली आहे. या मार्गावर धावणार्या बहुतांश एस.टी. बसेस ग्रामीण भागातील विद्यार्थी ने-आण करण्यासाठी धावतात, तर काही एस.टी मुक्कामी आहेत.