| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील वारे येथे स्थानिक क्रिकेट सामन्यात वाद निर्माण झाले होते. त्यावेळी क्रिकेट सामना पाहात असलेल्या तरुणावर किरकोळ वादातून कोयत्याने वार केले होते. दरम्यान, याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेतील आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन जखमी तरुण ऋषिकेश सुधाकर म्हसे यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.
13 मार्च आणि 14 मार्च रोजी कळंब जवळील वारे येथे स्व प्रवीण कमलाकर वारे अंतर गाव क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. 13 मार्च अंतर्गत गाव क्रिकेट स्पर्धेत वारे गावातील दोन संघांमध्ये क्रिकेट सामना सुरू होता, त्या सामन्यातील निर्णयाबद्दल काही वाद मैदानात निर्माण झाले होते. त्यावेळी ऋषिकेश सुधाकर म्हसे आणि गोविंद सुदाम हे आजूबाजूला बसून सामना पाहात होते. त्यावेळी गोविंद म्हसे यांच्याकडून ऋषिकेश म्हसे यांना शिवीगाळ केली जात होती आणि त्याबाबत तेथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी समजूत काढून प्रकरण मिटविले होते. त्यानंतर आपली टीम मैदानात असल्याने गोविंद म्हसे हे मैदानात गेले. मात्र, त्यानंतर दुसर्या दिवशी 14 मार्च रोजी मध्यरात्री गोविंद म्हसे हे हातात कोयता घेऊन आले आणि त्यांनी काहीही न विचारता ऋषिकेश सुधाकर म्हसे यांच्या हातावर वार केला. त्यानंतरचा दुसरा वार हा तेथे उपस्थित असलेल्या स्थानिकांनी अडवला आणि मोठा अनर्थ टळला. जखमी अवस्थेत कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यासाठी नेण्यात आले. याबाबत ऋषिकेश म्हसे यांच्या तक्रारीनंतर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.