| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील एका स्टँडला भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू व माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, स्टेडियमच्या तीन प्रवेशद्वारांना अनुक्रमे दिलीप सरदेसाई, एकनाथ सोलकर व डायना एडुलजी यांचे नाव देण्यात येणार आहे. त्याचा अनावरण सोहळा गुरूवारी (दि.9) वानखेडे स्टेडियममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या एपेक्स काऊन्सिलच्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या बैठकीत स्टँड व प्रवेशद्वाराला दिग्गज खेळाडूंची नावे देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार आता पत्रकार कक्षाच्या खालील बाजूस असलेला लेव्हल वन स्टँड आता रवी शास्त्री यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. तसेच गेट क्रमांक 3, 5 व 6 आता अनुक्रमे दिलीप सरदेसाई, डायना एडुलजी व एकनाथ सोलकर यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले की, महान व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी आपण गुरूवारी एकत्र येत असताना, हा सोहळा मुंबई क्रिकेटसाठी एक अभिमानाचा क्षण असणार आहे. तसेच, दिग्गजांना त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल आमच्याकडून दाखवण्यात आलेला हा आदर आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्टँड, प्रवेशद्वाराला दिग्गजांची नावे
