| सुकेळी | वार्ताहर |
राज्यातील सफाई कामगारांचे अनेक वर्षांपासूनचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, ते अद्यापही मार्गी लागलेले नाहीत. सफाई कामगारांना हक्काचे घर मिळावे वारसा हक्काचे घर मिळावे, वारसा हक्काने कुटुंबातील सदस्यास नोकरीत सामावून घ्यावे आदी मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे माजी अध्यक्ष मुकेश सारवान यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारकडे पाठपुरवठा सुरु आहे. तसेच सफाई कामगारांचे स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी शिवराज्य सफाई कर्मचारी सेना महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा अधिकारी कार्यालय अलिबाग दक्षता समिती सदस्य विलास सोलंकी हे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले.
सोलंकी पुढे म्हणाले की रायगड जिल्ह्यात दौरा करुन सफाई कामगारांचे प्रश्न जाणुन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. ज्या पालिकांच्या मुख्याधिकार्यांनी सफाई कामगारांच्या प्रश्नांवर कार्यवाही केलेली नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारकडे मागणी करणार आहे. सफाई कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. ज्या घरात कर्मचारी राहतात ती घरे कर्मचार्यांच्या नावे व्हावी, वारसा हक्काने सफाई कर्मचार्यांस कुटुंबातील सदस्यास शासकीय सेवेत घ्यावे, लाड पागे समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी अद्याप करावी यासंह अनेक मागण्या असल्याचे सोलंकी यांनी सांगितले, यावेळी संतोष सोलंकी, दीपक गायकवाड, उमेश गोयल, चिमण सोलंकी, मितेश सोलंकी आदी उपस्थित होते.