कबड्डी शौकिनांनी लुटला आनंद
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव नगरपंचायत हद्दीतील दि. 7 व 8 जानेवारी रोजी महाराणा प्रताप नगर माणगाव येथील मैदानावर आयोजित केलेल्या माजी आमदार तथा लोकनेते स्व. अशोकदादा साबळे स्मृती चषक कबड्डी स्पर्धेत पाले खुर्द कबड्डी संघाने उत्कृष्ट चढाई व पकड करीत अंतिम सामन्यात पन्हळघर कबड्डी संघाचा पराभव करीत अंतिम विजेतेपद पटकाविले. त्यांना रोख रक्कम दहा हजार रुपये व आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कबड्डी स्पर्धेत तालुक्यातील गाव टू गाव 32 संघांनी सहभाग घेतला होता.
या कबड्डी स्पर्धेतील उपविजेते पन्हळघर कबड्डी संघास रोख रुपये 7 हजार व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचे विजेते उंबर्डी कबड्डी संघास रोख रुपये 5 हजार व आकर्षक चषक तर चतुर्थ क्रमांकाचे विजेते यजमान महाराणा प्रताप नगर माणगाव कबड्डी संघास रोख रुपये 3 हजार व आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट रेंडर (चढाई) म्हणून उंबर्डी कबड्डी संघाचा नितेश, उत्कृष्ट डिफेंडर (पकड) व पब्लिक हिरो (अष्टपैलू खेळाडू) म्हणून पन्हळघर कबड्डी संघाचा अमन शिंदे यांना गौरविण्यात आले. या कबड्डी स्पर्धेत रायगड जिल्ह्यात नावाजलेले पंच माणगाव येथील निलेश साळवी व केतन भिंगारे यांनी उत्कृष्ट पंचाची भूमिका बजावली.
या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ राजिपचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती अॅड. राजीव साबळे, बाळासाहेबांची शिवसेना माणगाव तालुकाप्रमुख अॅड. महेंद्र मानकर, माणगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, बाळासाहेबांची युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे,बाळासाहेबांची शिवसेना माणगाव शहर प्रमुख सुनील पवार,नगरसेवक कपिल गायकवाड, नगरसेवक दिनेश रातवडकर,माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण पवार,उद्योजक विरेश येरुणकर,स्वीकृत नगरसेवक हेमंत शेट, माजी स्वीकृत नगरसेवक नितीन बामगुडे, मारवत पवार आदींसह कबड्डी शौकीन व महाराणा प्रताप नगराचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सुनील पवार, राजेंद्र चव्हाण, सनी चव्हाण, संजय चव्हाण, शत्रुघन मोहिते, नंदू जाधव, दिलीप पवार, महेंद्र चव्हाण, दिपक पवार, करण चव्हाण, रोहित जाधव, मंगेश जाधव, सुजल पवार, निकेश मोहिते, राकेश पवार, आकाश पवार, साजन मोहिते, जयू जाधव, क्रिश चव्हाण, करण पवार आदींसह महाराणा प्रताप नगर माणगाव कबड्डी संघाच्या सर्व खेळाडूंनी तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेऊन स्पर्धा उत्साहात संपन्न केल्या.