शेतकरी कामगार पक्षाची मागणी
| अलिबाग | प्रतिनिधी |
नवघर पूल धोकादायक असल्याने अलिबाग-रोहा (रामराज मार्गे) जाणारी एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ही वाहतूक कुर्डुस मार्गे वळवण्यात आली होती. ती आता 15 ऑगस्ट नंतर बंद करण्यात आली. परंतु; ती एसटी तातडीने सुरू करण्यात यावी, अशी ठाम मागणी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकापच्या शिष्टमंडळाने स्थानक प्रमुखांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
गेल्या दोन वर्षांपासून नवघर गावाजवळील पूल धोकादायक अवस्थेत असल्याने एस.टी.ची बस सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, महिला-पुरुषांना नोकरीसाठी तसेच नागरिकांना दैनंदिन कामांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रोहा परिसरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना जाण्यास प्रवाशाची मोठी गैरसोय होत आहे. रोहा परिसरातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने कुर्डुस मार्गे रोहा येथे एसटी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच, आक्षी मार्गे जाणाऱ्या बसेसही बेली पूल धोकादायक असल्याने बंद करण्यात आल्या आहेत. त्यांनाही पर्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सहाण-पाल्हे पुलावरून रेवदंड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस आक्षी येथे देखील नेण्यात येण्यात याव्यात, जेणेकरून विद्यार्थी, प्रवाशी व महिला, ज्येष्ठ नागरिकांचा वाहतूकीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले. यावेळी शेकाप अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, तालुका युवक अध्यक्ष विक्रांत वार्डे, तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, तालुका सोशल मिडीया प्रमुख संजना किर, अंजली ठाकूर, अभिजित वाळंज, जमाल सय्यद, ॲड. निनाद रसाळ, यश पाटील, ॲॅड. अश्विनी ठोसर, ॲड. अनिकेत म्हात्रे, अक्षय डिकले, नितीन जानकर यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
