नळफोडी अंगणवाडी सेविकेची बेकायदेशीर नेमणूक रद्द करून अंगणवाडी त्वरित सुरू करा

आ जयंत पाटील यांची मागणी

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील नळफोडी येथील अंगणवाडीमध्ये विद्यार्थी पाठवत नसल्यामुळे मोठे नुकसान होत आहे. याठिकाणी सुषमा सीताराम चाचले यांची बेकायदेशीर झालेली नेमणूक रद्द करून त्याठिकाणी माही महेश भुवड यांची तातडीने नेमणूक करावी अशी मागणी शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन खाली विधानपरिषदेत आज केली.

शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आज सभागृहात रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामधील नळफोडी या गावातील अंगणवाडी शिक्षिकेच्या बेकायदेशीर नेमणुकीवर कारवाई करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली.
जि. रायगड, ता.माणगाव येथील नळफोडी या गावामध्ये अंगणवाडीची शिक्षिका नेमण्याचे कार्य सुरु होते. नियमांनुसार ही शिक्षिका त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. सुषमा सीताराम चाचले या नळफोडी गावातील अंगणवाडीच्या शिक्षिका होत्या, मात्र त्यांचा विवाह झाल्यावर त्या खरौली या गावामध्ये गेल्या. असे असून सुद्धा अंगणवाडीची शिक्षिका म्हणून त्यांची पुन्हा नेमणूक करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी स्वतः मुख्य कार्याधिकाऱ्यांना फोनद्वारे संपर्क साधून या बेकायदेशीर नेमणुकीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. गेली ६ महिने नळफोडी येथील ग्रामस्थ एकही विद्यार्थी या अंगणवाडीमध्ये पाठवत नाहीत ज्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तरी याठिकाणी सुषमा सीताराम चाचले यांची बेकायदेशीर झालेली नेमणूक रद्द करून त्याठिकाणी माही महेश भुवड यांची तातडीने नेमणूक करावी अशी मागणी आमदार भाई जयंत पाटील यांनी राज्य शासनाकडे केली. यागावातील छोट्या मुलांवर हा अन्याय होत असून, गेली ७ महिने गावकऱ्यांनी या अंगणवाडीवर बहिष्कार टाकला, आणि अनेक वेळा मुख्य कार्याधिकारी व इतर सदस्यांना सांगून सुद्धा यामध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात अली नाही. या सर्व गोष्टींची नोंद घेत राज्य सरकार यावर काही कारवाई करणार का? असा प्रश्न आमदार भाई जयंत पाटील यांनी सभागृहात उपस्थित केली.

Exit mobile version