अर्ज भरण्यास प्रारंभ
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मिनी विधानसभा समजल्या जाणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्या सुमारे 7649 ग्रामपंचायतीच्या आणि नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यात रायगड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 15 तालुक्यातील तब्बल 240 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुका म्हणजे आगामी काळात होणार्या जि.प., पं.स निवडणुकांची रंगीत तालीम ठरणार आहे. या निवडणुकांसाठी सोमवारी (दि.28) अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे.
या 240 ग्रामपंचायतींमध्ये अलिबाग तालुक्यातील 6, उरण तालुक्यातील 18, कर्जत तालुक्यातील 7, खालापूर तालुक्यातील 14, तळा तालुक्यातील 1, पनवेल तालुक्यातील 10, पेण तालुक्यातील 26, पोलादपूर तालुक्यातील 16, महाड तालुक्यातील 73, माणगाव तालुक्यातील 19, मुरुड तालुक्यातील 5, म्हसळा तालुक्यातील 13, रोहा तालुक्यातील 5, श्रीवर्धन तालुक्यातील 13, सुधागड तालुक्यातील 14 या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत. नजिकच्या काळात याही निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी 15 तालुक्यातील या 240 ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहिर झाल्याने ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांची रंगीत तालीम ठरणार असल्याने या निवडणूकांना महत्व प्राप्त झाले असल्याचे जाणकार सांगत आहेत.
मुरूड-पाच ग्रा.पं.निवडणुका
आगरदांडा मुरूड तालुक्यातील कोर्लई, वेळास्ते, वावडुंगी, तेलवडे, काकळघर या 5 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारपासून अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सर्व प्रक्रिया तहसिलदार कार्यालयात होणार असून तेथे 5 निवडणूक निर्णय अधिका-यांची नेमणुका करण्यात आले आहेत. अर्जासोबत सादर करावयाची कागदपञे-शपथ पञातील माहितीनुसार चारिञ्य पडताळणी प्रमाणपञ, संपत्ती विवरणपञ, अपत्याबाबतचे प्रतिज्ञापञ, थकबाकीदार नसल्याचा दाखला, जिल्हा परिषदेची ठेकेदार नसल्याचा दाखला, शौचालय असल्याचे प्रमाणपञ ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
निवडणूक कार्यक्रम
28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर – अर्ज दाखल करणे
5 डिसेंबर – नामनिर्देशनपत्रांची छाननी
7 डिसेंबर – अर्ज माघारी
18 डिसेंबर मतदान
20 डिसेंबर – मतमोजणी