। माणगाव । वार्ताहर ।
विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन माणगाव-भिरा एसटी बसची फेरी चालू करावी, अशा मागणीचे निवेदन माणगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नुकतेच माणगाव आगार व्यवस्थापक चेतन देवधर यांना देण्यात आले. यावेळी आघाडीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ सोनावणे, सुवर्णा साळवी, माणगाव तालुका अध्यक्ष किरण मोरे व सहाकारी उपस्थित होते.
माणगाव ते भिरा ही एसटी बस चालू होती, ती काही कारणास्तव बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, तसेच नागरिकांचे हाल होत आहेत. याची दखल परिवहन महामंडळाने घ्यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या गाडीबाबत माणगाव आगार व्यवस्थापक चेतन देवधर यांनी सांगितले की, माणगाव येथून पहाटे 5.30 वाजता गाडी भिरा येथे जाते. तेथून सकाळी 6:30 वाजता ही गाडी येते. सायंकाळी त्याठिकाणी प्रवासी अगर विद्यार्थी मिळत नसल्याने सायंकाळची फेरी बंद ठेण्यात आली आहे. पुरेसे प्रवासी मिळू लागल्यास सायंकाळची फेरी सुरु करण्यात येईल.