19 एप्रिलपर्यंत मिळणार क्रिकेट प्रेमींसाठी खेळाची पर्वणी
| अलिबाग | प्रतिनिधी |
25 वर्षाखालील रायगड प्रीमिअर लीगच्या दुसर्या पर्वाचा प्रारंभ अलिबागमध्ये रविवारी (दि.9) कुरुळ येथील आरसीएफ क्रीडा संकुलात पार पडला. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप नाईक यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी अॅड. मनमीत पाटील, जिल्हा वकील संघटनेचे सदस्य अॅड. कौस्तुभ पुनकर, अॅड. प्रथमेश पाटील, अॅड. पंकज पाटील, राजाराम हुलवान आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यातील कुलाबा स्ट्रायकर्स, सह्याद्री चॅम्पियन, खांदेरी-उंदेरी किंग्ज, द्रोणागिरी मास्टर्स, रायगड वॉरिअर्स, जंजिरा चॅलेंजर्स असे सहा संघ यास्पर्धेत सहभागी झाले आहेत. कुलाबा स्ट्रायकर्स व जंजिरा चॅलेंजर या संघामध्ये उद्घाटनीय सामना झाला. जंजिरा चॅलजर्स संघाने सुरुवातीला गोलंदाजी स्वीकारली. त्यामुळे कुलाबा स्ट्रायकर्स संघाने प्रथम फलंदाजीला सुरुवात केली. 20 षटकांच्या सामन्यात कुलाबा संघाने 14 षटकांत 63 धावा पूर्ण केल्या. 14 षटकांत जंजिरा संघाने कुलाबा संघाला रोखल्याने 64 धावांचे आव्हान जंजिरा संघासमोर राहिले. कुलाबा संघाने देखील जंजिरा संघाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र जंजिरा संघाने एक, दोन अशा धावांवर भर देत आव्हान पूर्ण करून विजय मिळविला.
लेदर बॉलमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय क्रमांकास चषक व बक्षीस दिले जाणार आहे. तसेच उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर, उत्कृष्ट यष्टीरक्षक या खेळाडूंना चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यातील खेळाडूला मालिकावीर म्हणून चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. आरसीएफ वसाहतीमधील क्रीडा संकुलमधील मैदानात 19 एप्रिलपर्यंत प्रीमिअर लीगची स्पर्धा होणार असून क्रिकेट प्रेमींना घरबसल्या क्रिकेटचा आनंद घेता यावा यासाठी युटयूबवर स्पर्धा पाहण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती राजेश पाटील यांनी दिली.