खालापुरात भातपेरणीला प्रारंभ

| खोपोली | प्रतिनिधी |
पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी वर्ग शेतीपूर्व मशागतीला लागला असून, काही ठिकाणी पावसाची चाहूल लागल्याने शेतकर्‍यांनी पेरणीला सुरूवात केली आहे. सकाळ व संध्याकाळी शेतात ठिकठिकाणी बळीराजा सर्जा-राजाला घेऊन नांगरणी करताना दिसत आहे, तर प्रगतशील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेत नांगरणी करताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून तालुक्यात पाऊस चांगला पडत असल्याने शेतकर्‍यानी पेरणीला सुरूवात केली. शेतकर्‍यांच्या घरची मंडळी नांगरणी केलेल्या शेतातील ढिपळ्या फोडून माती सारखी करण्यात मग्न झाले आहेत. बहुतांशी शेतकरी मागील वर्षात उत्पन्न घेतलेल्या भाताचे बियाणे पेरणीसाठी वापरत आहेत, तर काहीजण नवीन बियाण्यांचा वापर करू लागले आहेत. पेरणीच्या दृष्टीने शेतकरी तयारीला लागला आहे. महिला शेतामध्ये मशागत करत असून, पुरुष नांगर तयार करून घेणे, बैलजोडीची तरतूद करणे, फाळाला धार लावणे इतर शेती अवजारे तयार करून घेणे या कामांमध्ये व्यस्त आहे. सध्या विविध कृषी केंद्रांवर भातबियाणे खरेदी सुरू झाली आहे. भातबियाण्यांप्रमाणेच खतांची मागणी नोंदवली जात आहे. यावर्षीचा पाऊस कसा पडणार, याचे अंदाज बांधले जात आहेत.

Exit mobile version