‌‘सकाळी सहा वाजता मुरूड-बोरीवली बस सुरू करा’

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरूड बोरीवली सकाळी 6 वाजता व बोरीवलीवरुन मुरूडला रात्री दहा वाजता नवीन बस (एसटी) सुरू करुन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुरूड पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी राज्य परिवहन मंडळ रायगड विभागीय नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची प्रत मुरूड आगार व्यवस्थापक राहुल शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुरुड तालुक्यातील अनेक नागरिक कामासाठी बोरीवली, दहिसर, कांदिवली, गोरेगाव विविध परिसरात वास्तव्य करीतत आहेत. बोरीवली हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे त्याचा फायदा स्थानिक रहिवासी असलेल्या प्रवाशांना व पर्यटकांना मोठ्या प्रमाणात होईल. जशी मुरूडवरून सकाळच्या वेळेत मुंबई सेंट्रलला जाण्यासाठी गाडी सोडण्यात येते. त्याचप्रमाणे काही मिनिटांचे अंतर सोडून मुरूड-बोरीवली सकाळी 6:00 किंवा 6.30 वाजताच्या दरम्यान सोडावी व तीच गाडी रात्री 10 किंवा 10.30 वाजता दरम्यान सोडल्यास मोलमजुरीकरिता गेलेल्या स्थानिक नोकरदार वर्गाला मोठा फायदा होणार आहे. त्याबरोबर आपले एसटीचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे. तरी या निवेदनाचा विचार करुन स्थानिक प्रवासी व पर्यटकांचा विचार करुन ही एसटी लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी अरविंद गायकर यांनी निवेदनात केली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत उपाध्यक्ष देवेंद्र सत्वीडकर, शैलेश वारेकर, दामोदर खरगावकर, उत्तम पाटील दिवेश बोरदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version