विखे पाटील सहकारी कारखाना सुरू करा; भाई मोहन गुंड यांची मागणी

। बीड । प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्‍न लक्षात घेता, विखे पाटील सहकारी कारखाना सुरू करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते भाई मोहन गुंड यांनी केली आहे. शिवाय या आशयाचे निवदेन शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने साखर आयुक्त साखर पुणे, महाराष्ट्र राज्य सहकार मंत्री, प्रादेशिक उपविभाग साखर औरंगाबाद तथा केज तहसील कार्यालय यांच्याकडे लेखी स्वरूपात देण्यात आले आहे. मागील दोन वर्षात ऊस शेतीसाठी आवश्यक त्या असा पाऊस सातत्याने झाल्यामुळे येथील बळी राज्याने ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. टाळेेबंदी आणि निसर्गाची अवकृपा यामुळे विस्कटलेले आर्थिक गणित किमान अवस्थेत पूर्ववत होईल, हाती चार पैसे येतील या अपेक्षेने ही लागवड करण्यात आली. पण आलेल्या पिकानंतर या संबंधातील आवाहन बळीराजापुढे पुढे राहिले आहे. जिल्ह्यातील आंबा साखर कारखाना, वाघाळा-आंबेजोगाई, वैजनाथ साखर कारखाना, पांगरी-परळी हे कारखाने अद्यापही सुरू करण्यात आलेले नाहीत. बळीराजाच्या पल्लवित झालेल्या आशा संवर्धित करण्यासाठी सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची आवश्यता आहे. मात्र याची दखल संबंधितांकडून घेण्यात येत नसल्याची शोकांतिका आहे. पण म्हणून बळीराजा एकाकी आहे, असे नाही. शेतकरी कामगार पक्ष हा सदैवच बळीराजाचा कैवारी म्हणून आपली भूमिका कर्तव्यदक्षतेने पार पाडत असतो. बळीराजाच्या समस्येची दखल घेण्यापासून त्या समस्याचे निराकरण होईपर्यंत शेतकरी कामगार पक्ष आत्मियेतेने कार्यरत राहतो.

यानुषंगाने शेकाप नेते भाई मोहन गुंड यांनी आता ऊस उत्पादक बळीराजासाठी भूमिका घेतली आहे. या बळीराजाला फायदा मिळण्यासाठी त्यांनी विखे पाटील सहकारी कारखाना सुरू करण्याची मागणी संबंधित आस्थापनांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात, बीड जिल्ह्यात सर्वाधिक ऊस गाळपाची कॅपॅसिटी असणारा केज येथील विखे पाटील सहकारी साखर कारखाना अनेक वर्षापासून बंद आहे. याचे कारणदेखील ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना माहीत नाही. हे काहीही असले तरी, ऊसाचा अतिरिक्त प्रमाण लक्षात घेता तात्काळ चालू करण्यात यावे. याशिवाय, शेतकर्‍यांनी सहकाराचे युनिट उभारावे म्हणून जमिनी कवडी मोल भावाने साखर कारखान्यासाठी दिल्याचे नमूद केले असून, बळीराजाने उत्पादित केलेल्या ऊसाचे हक्काने गाळप करता येण्यासाठी शेतकर्‍यांच्या हक्काचा विखेपाटील सहकारी साखर कारखाना (उबरी) तात्काळ सुरू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Exit mobile version