राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

चार संघांची उपउपांत्य फेरीत धडक

| पुणे | क्रीडा प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने शिवशक्ती महिला संघाने आदित्य चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. पुणे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात मॅटवर ही स्पर्धा पार पडत आहे. या स्पर्धेत नाशिक शहर, पुणे ग्रामीण यांनी मुलींमध्ये, तर उस्मानाबाद, परभणी यांनी मुलांमध्ये उपउपांत्य फेरीत धडक दिली.

पहिल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात नाशिक शहरने पूर्वार्धातील 18-24 अशा 6 गुणांच्या पिछाडीवरून मुंबई उपनगर पूर्वचा कडवा प्रतिकार 43-38 असा मोडून काढला. पूर्वार्धात चाचपडत खेळणाऱ्या नाशिककरांना उत्तरार्धात सूर सापडला. विदिशा सोनार, रिया खाडे यांनी शेवटच्या 5मिनिटात उपनगर वर लोण देत आघाडी घेतली होती. परंतु, नाशिकच्या मुलींची आगेकूच सुरू असताना मुलांना मात्र आपला गाशा गुंडाळावा लागला. उस्मानाबादने नाशिक शहरचा प्रतिकार 46-33 असा मोडून काढला. उस्मानाबादच्या विश्वजित सुपेकर, स्वराज मुळे, सुजय कुटे यांनी चतुरस्त्र खेळ करीत सामन्यावर आपले वर्चस्व राखले. विश्रांतीला 22-15 अशी त्यांच्याकडे आघाडी होती.

मुलींच्या दुसऱ्या सामन्यात पुणे ग्रामीणने साताऱ्याला 40-15 असे सहज नमविले. पहिला लोण देत पुणे ग्रामीणने मध्यांतराला 18-06 अशी भक्कम आघाडी घेतली. मध्यांतरानंतर आपला खेळ अधिक गतिमान करीत 2 लोण देत सामना एकतर्फी केला. एकीकडे पुणे ग्रामीणच्या मुली उपांत्यपूर्व फेरी दाखल होत असताना मुलांच्या संघाला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. परभणीने पुणे ग्रामीणला 50-25 असे सहज नमविले. दोन्ही डावात 2-2 लोण देत परभणीने गुणांचे अर्धशतक गाठले. पहिल्या डावात 28-11 अशी परभणीकडे आघाडी होती.

मुलींच्या तिसऱ्या सामन्यात जालना संघाने नंदुरबार संघावर 42-21 मात करीत विजय मिळविला. मध्यंतराला जालना संघाकडे 22-10अशी आघाडी होती. जालन्याच्या मोनिका पवार व वैष्णी शिवतरे यांनी सुरेख चढाया केल्या. राणी भुजंग हिने पकडी केल्या. चौथ्या सामन्यात परभणी संघाने कोल्हापूर संघावर 43-36 असा विजय मिळविला. मध्यंतराला परभणीकडे 28-11 अशी आघाडी होती. परभणीच्या सोनाली नावकीकर, रागिनी दाहे यांनी जोरदार चढाया केल्या, तर प्रतिक्षा बाबर हिने पकडी केल्या.

Exit mobile version