ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात

13 डिसेंबरला होणार सुनावणी!
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
स्थानिक स्वराज्य संस्थामधल्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा तापणार असल्याचं दिसत आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या अध्यादेशाला काही दिवसांपूर्वी स्थगिती दिलेली असताना, आता राज्य सरकार पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. आता 13 डिसेंबर रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे.
ओबीसी आरक्षणावरून देशातील इतर राज्यांना वेगळा आणि महाराष्ट्राला वेगळा नियम का? असा सवाल उपस्थित करत ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात किंवा सर्वच निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
मंत्री छगन भुजबळ हे दिल्ली दौर्‍यावर असून, त्यांनी दिल्ली येथे खासदार प्रफुल्ल पटेल आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासोबत ओबीसी आरक्षणप्रश्‍नी शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञांच्या भेटी घेतल्या.

Exit mobile version