पेणमध्ये राज्यस्तरीय नाट्य महोत्सव उत्साहात

‌‘ब्रेक पॉइंट’ला प्रथम क्रमांक

| पेण | प्रतिनिधी |

दत्त अवधूत एंटरटेनमेंट आणि स्वरंग पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय नाट्य महोत्सव (दोन अंकी नाटकांची स्पर्धा) उत्साहात पार पडला. दत्त अवधूत चषक 2026 अंतर्गत झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित नाट्यसंस्थांनी सहभाग घेत उत्कृष्ट सादरीकरण केले. या महोत्सवात ब्रेक पॉइंट (थिएटरवाले, मुंबई) या नाटकाने सरस कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तर ती ती आणि ती (प्रवेश कला क्रीडा मंच, मुंबई) या नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला.

अभिनय विभागात ‌‘ब्रेक पॉइंट’मधील सुमित घाग (अभिराम) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच भावना रहाटे यांनी ‌‘ती ती आणि ती’ मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब पटकावला. उत्तेजनार्थ पुरस्कारांमध्ये अभिनेता गटात विष्णू निंबाळकर (परमिता, अकोला ‌‘तहान’) आणि शिवम पाटील (लोकसेवा, अलिबाग ‌‘विदूषक’) यांचा सन्मान करण्यात आला. अभिनेत्री गटात सुकन्या जोशी (‌‘नकळत दिसले सारे’) आणि रुपाली रोकडे (‌‘कोणाचा होतो नी कोणाची सोय’) यांना गौरविण्यात आले.

तांत्रिक विभागातही ‌‘ब्रेक पॉइंट’ने वर्चस्व राखले. सागर माने यांना दिग्दर्शन व लेखनासाठी, यश मोडक यांना नेपथ्यासाठी, तसेच सागर माने, स्विकार पाटील आणि साहिल खेडसकर यांना पार्श्वसंगीतासाठी पुरस्कार मिळाले. प्रकाशयोजनासाठी श्याम चव्हाण यांचा विशेष सन्मान करण्यात आला. एकूणच, दर्जेदार नाट्यप्रयोग आणि कलाकारांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हा नाट्य महोत्सव प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वी ठरला.

Exit mobile version