| चौल | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील चार गुणवंत कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे सन 2024 चा कामगार भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कोल्हापूर येथे होणाऱ्या समारंभात त्यांना सन्मानचिन्ह व 25 हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्यांमध्ये प्रमोद दत्तू पाटील, उमेश वसंत कांबळे, संतोष रामा मोरे आणि नितीन मुरली राव यांचा समावेश आहे.
प्रमोद पाटील हे रासायनिक उद्योग क्षेत्रातील अनुभवी अधिकारी असून कामगार संघटना, सामाजिक संस्था आणि सहकारी क्षेत्रात सक्रिय आहेत. उमेश कांबळे यांनी उद्योगातील गुणवत्ता सुधारणा, नवोपक्रम योजना तसेच कामगार कल्याण उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांतही सहभाग नोंदविला आहे. संतोष मोरे हे महाड औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असून आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांनी पूरग्रस्त व गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. नितीन राव हे अग्निसुरक्षा आणि औद्योगिक सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ असून, विविध उद्योगांमध्ये सुरक्षा व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत. समाजोपयोगी उपक्रम, रक्तदान आणि शैक्षणिक मदतीत त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. या चौघांच्या निवडीमुळे रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, विविध सामाजिक, औद्योगिक आणि कामगार संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
रायगडच्या चौघांना राज्यस्तरीय गुणवंत कामगार पुरस्कार
