| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या हेदवली येथील रायगड जिल्हा परिषद शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत देखील आदर्श ठरत आहे. रायगड जिल्ह्यात तसेच कोकण विभागात जिल्हा परिषद शाळांमध्ये हेदवली शाळा अव्वल ठरली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेचे परीक्षण करणेसाठी राज्य पातळीचे परीक्षक मंगळवारी (दि.27) रात्रीच्या वेळी हेदवली गावात पोहचले, मात्र रात्रीची वेळ असून देखील शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थ पालकांचा उत्साह तेवढाच होता.
राज्यस्तरीय मूल्यमापन समिती पथक क्रमांक दोनमधील संपत सूर्यवंशी संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांनी पथक प्रमुख म्हणून भेट दिली. त्या समितीमध्ये रमाकांत काटमोरे उपसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे-सदस्य, सतीश चौधरी शिक्षणाधिकारी प्राथमिक नंदुरबार- सदस्य, रमेश चौधरी वरिष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे -सदस्य सचिव यांनी शाळेत येऊन शाळेची पाहणी केली.
राज्यस्तरीय समितीला कर्जत तालुक्याचे ठिकाणापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या हेदवली गावात पोहचण्यास उशीर झाला. मात्र, त्यावेळी अंधार पडलेला असताना शाळेच्या मार्गावर असलेल्या मंदिरात संपूर्ण गाव हरिपाठ करीत असल्याचे दिसून आले. तसेच पुढे शाळेत गेल्यावर शाळेच्या बाहेर रात्रीची वेळ असताना देखील विद्यार्थ्यांनी समितीचे लेझिम पथकाने स्वागत केले. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा राज्यस्तरीय मूल्यमापन समितीकडून समितीने शाळेने तालुका, तसेच जिल्हा आणि विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल या शाळेचे वैशिष्ट तरी काय? याची माहिती घेतली. शाळेने राबविलेल्या योजना पाहून समितीतील सर्वच सन्माननीय अधिकार्यांनी शाळेचे तोंड भरून कौतुक केले. शाळेतील प्रत्येक उपक्रमांचा बारकाईने अभ्यास केला. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया, पालकांच्या प्रतिक्रिया, विद्यार्थ्यांचे लेझीम सादरीकरण या सर्वच गोष्टी अवर्णनीय होत्या. त्यामुळे हेडवली रायगड जिल्हा परिषदेची शाळा राज्यात नावाचा डंका वाजविण्यासाठी तयार आहे.