विजेत्याला 3 लाख रुपयाचे बक्षीस
। अलिबाग । वार्ताहर ।
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट आणि चित्रफित निर्मितीच्या स्पर्धेचे आयोजन दि.01 जून ते 30 जून पर्यंत करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असल्याकारणाने या स्पर्धेसाठी व्यावसायिक, हौशी चित्रपट निर्माते, व्हिडीओ निर्माते व युट्यूब ब्लॉगर यांना सहभागी होता येणार आहे.
राज्यस्तरावर निवड होणार्या स्पर्धकासाठी प्रथम पारितोषिक 3 लाख रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय 2 लाख रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय 1 लाख रुपये व सन्मानचिन्ह व उत्तेजनार्थ 50 हजार रुपये व सन्मानचिन्ह सोबतच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी जिल्हास्तरावर दि.15 जून पर्यंत चित्रफित सादर करावी. जिल्हास्तरावर सहभागी एकूण स्पर्धकांपैकी उत्कृष्ट 5 स्पर्धकांना जिल्हा कक्षाकडून सन्मानपत्र देण्यात येईल. तसेच त्यांच्या चित्रफिती राज्यकक्षाकडे पाठविण्यात येतील व दि.30 जून पर्यंत अंतिम निवड प्रक्रिया पार पडेल. चित्रफितीचा कालावधी जास्तीत जास्त 7 मिनिट असावा, दर्जा उत्तम असावा तसेच ती चित्रफित अप्रकाशित असावी. अधिक माहितीसाठी जवळच्या पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क करावा तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, रायगड येथील जिल्हा व्यवस्थापकसिद्धेश चंद्रकांत राऊळ 9823986747 यांच्याशी संपर्क साधावा.