| रेवदंडा | प्रतिनिधी |
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 लागू झाल्यानंतर गुन्हे तपास प्रक्रियेत तांत्रिक अचूकता आणण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत रायगड जिल्हा पोलीस ताफ्यात अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली असून, जिल्ह्यातील तपास यंत्रणेला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी ताकद मिळाली आहे. या अत्याधुनिक व्हॅनमध्ये भौतिक, रासायनिक, जैविक तसेच डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी लागणारी अत्याधुनिक साधनसामग्री (किट्स) बसविण्यात आली आहे. त्यासाठी विशेष प्रशिक्षित मनुष्यबळ नेमले असून, त्यात 04 असिस्टंट केमिकल अनालायझर, 02 सायंटिफिक असिस्टंट आणि वाहन चालकाचा समावेश आहे. त्यामुळे ही व्हॅन गंभीर गुन्ह्यांच्या तपासात घटनास्थळीच ठोस व शास्त्रशुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम करणार आहे. हे पुरावे न्यायालयात सादर करून आरोपींना शिक्षा होण्याची प्रक्रिया अधिक वेगवान व खात्रीशीर होईल. परिणामी, निर्दोषांना दिलासा तर गुन्हेगारांना शिक्षा असे न्यायाचे तत्त्व अधिक प्रभावीपणे लागू होईल.






