राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

मुंबईच्या खेळाडूंची आगेकूच

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबईच्या खेळाडूंनी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत शानदार कामगिरी करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. महम्मद घुफ्रान, पंकज पवार, प्रशांत मोरे या मुंबईकरांसह संदीप दिवे या मुंबई उपनगरच्या खेळाडूने या स्पर्धेत अंतिम चारमध्ये प्रवेश केला.

मुंबईत सुरू असलेल्या या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपउपांत्य सामन्यात घुफ्रानने पुण्याच्या रहीम खानवर 23-6, 19-23 व 25-13 अशी मात केली व आगेकूच केली. मुंबईच्या पंकज पवारने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरवर 4-25, 14-13, 16-13 असा तीन सेटमध्ये विजय मिळवून उपांत्य फेरीत धडक मारली. मुंबई उपनगरच्या संदीप दिवे याने मुंबईच्या अशोक गौर याच्यावर 25-5, 21-7 अशी मात केली. तसेच, मुंबईच्या प्रशांत मोरे याने ठाण्याच्या झैद फारूकी याला 21-5, 21-15 असे नमवले.

महिला एकेरी विभागात प्राजक्ता नारायणकर, समृद्धी घाडीगावकर, श्रुती सोनावणे व काजलकुमारी यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्राजक्ताने उर्मिला शेंडगेला, तर समृद्धी घाडीगावकरने मेधा मठकरीला नमवले. श्रुती सोनावणेने अंबिका हरिथवर विजय साकारला. तर, काजलकुमारीने आकांक्षा कदमचे आवाहन संपुष्टात आणले.

Exit mobile version