प्रकल्प उभारणीस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई | प्रतिनिधी |
महानिर्मिती कंपनीतर्फे राज्यातील विविध जागांवर एकूण 577 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. सदर सौर प्रकल्प महानिर्मितीतर्फे इंजिनिअरिंग- प्रोक्युरमेंट- अँड कन्स्ट्रक्शन (इपीसी) तत्त्वावर उभारण्यात येणार आहेत. याकरिता महानिर्मिती भागभांडवल उभे करणार असून, उर्वरित रक्कम के.एफ.डब्ल्यू. बँक, जर्मनी यांच्याकडून अल्प दरामध्ये कर्ज घेणार असल्याने महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर याचा कोणताही अतिरिक्त भार येणार नाही.
या सौर क्षमता वाढीअंतर्गत कौडगाव, जि. उस्मानाबाद येथे 50 मेगावॅट क्षमतेचा, सिंदाला (लोहारा), जि. लातूर येथे 60 मेगावॅट क्षमतेचा तसेच औष्णिक विद्युत केंद्रामधील वापरात नसलेल्या जागेवर भुसावळ येथे 20 मेगावॅट, परळी येथे 12 मेगावॅट, कोराडी येथे 12 मेगावॅट, व नाशिक 8 मेगावॅट असे एकूण 52 मेगावॅट क्षमतेचे आणि शिवाजीनगर, साक्री, जि. धुळे येथे 25 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प असे एकूण 187 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यासाठी एकूण 746 कोटी रुपये खर्च होणार असून, यापैकी 158 कोटींचे भागभांडवल महानिर्मितीतर्फे उभारण्यात येणार असून, उर्वरित 588 कोटी रुपये, मेसर्स. के.एफ.डब्ल्यु. बँक, जर्मनी यांच्यातर्फे सन 2011 मधील मंजूर अर्थसहाय्य करारामधील शिल्लक कर्ज रकमेतून अल्प दरामध्ये प्राप्त होणार आहे.
तसेच 390 मेगावॅट सौर प्रकल्पांपैकी वाशिम-1 अंतर्गत जिल्ह्यातील मौजे दुधखेडा, परडी टाकमोर, तसेच कंझारा येथे एकूण 130 मेगावॅट क्षमतेचे तसेच वाशिम-2 प्रकल्पांतर्गत बाभूळगांव व सायखेडा येथे प्रत्येकी 20 मेगावॅट असे एकूण 40 मेगावॅट क्षमतेचे तसेच चंद्रपूर जिल्ह्यात कचराळा येथे 145 मेगावॅट क्षमतेचा तर यवतमाळ जिल्ह्यात मंगलादेवी, पिंपरी इजारा व मालखेड येथे प्रत्येकी 25 मेगावॅट असे एकूण 75 मेगावॅट क्षमतेचे असे एकंदरीत 390 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. याकरिता एकूण 1564 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, यापैकी 1200 कोटी रुपये 0.05 टक्के प्रतिवर्ष या दराने के.एफ.डब्ल्यु. बँक, जर्मनी यांच्याकडून कर्ज घेण्यात असून, महानिर्मिती 364 कोटी रुपये भागभांडवल उभे करणार आहे. या सौर प्रकल्पांमुळे महाराष्ट्र शासनाच्या हरित ऊर्जा निर्मितीमध्ये भर पडणार असून, याचा फायदा महाराष्ट्रातील ग्राहकांना होणार आहे.