स्थायी समितीकडून कामास मंजुरी
प्रीतम म्हात्रे यांच्या मागणीला यश
पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा गुरुवार, 9 सप्टेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्थायी समितीच्या सभेत छत्रपती संभाजी महाराज क्रीडा मैदान विकसित करण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी याबाबत मागणी केली होती.
दि.09 सप्टेंबर रोजी झालेल्या पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली. यात प्रामुख्याने पालिका मुख्यालय लगतचा छत्रपती संभाजी महाराज क्रीडा मैदान विकसित करण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी छत्रपती संभाजी महाराज मैदान विकसित करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच पनवेल महापालिका हद्दीतील काही प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण व डांबरीकरणाच्या कामांना देखील या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी मागणी केलेल्या प्रभाग क्र.18 मधील अग्निशमन केंद्र इमारत ते डॉ. मौलाना आझाद केंद्रापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण, झवेरी बाजार, बालाजी मंदिर परिसरातील रस्ता काँक्रीटीकरण व साईनगर येथील रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेविका प्रज्योती म्हात्रे यांच्या प्रभाग क्र.9 अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे या कामाला स्थायी समिती सभेत मंजुरी मिळाली आहे. तसेच नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या प्रभाग क्र.2 मधील नागझरी गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण या कामाला देखील मंजुरी मिळाली आहे.