उरणच्या नागरी सुविधांबाबत शेकापच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन

। उरण । वार्ताहर ।
उरण शहरात भेडसावणार्‍या नागरी सुविधांबाबत शेकापच्या वतीने उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विविध समस्या व त्यावर उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. उरण शहरात जानेवारी महिन्यापासून मंगळवार व शुक्रवारी पाणी पुरवठा बंद करण्यात आला. यामुळे शहर वासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी रानसाई धारणा व्यतिरिक्त हेटवणे किंवा मोरबे धरणाचा अतिरिक्त पाणी साठा घेऊन उरणकारांची तहान भागवावी, शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे रस्ते मोकळे होण्यासाठी सुनिश्‍चित धोरण आखावे, शहरात होत असलेली अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, शहरातील धुळीवाडा येथे नवीन पाण्याची लाईन टाकावी, पाण्याचे होणारे लिकेज काढावेत तसेच कीटकनाशक फवारणी करून पावसाळ्या आगोदर नालेसफाई करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

यावेळी मुख्याधिकारी संतोष माळी या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच उरण शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी शेकापचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांना शेकाप शिष्टमंडळ भेटणार आहेत. यावेळी निवेदन देताना शहर चिटणीस शेखर पाटील, तालुका सहचिटणीस यशवंत ठाकूर, शहर अध्यक्षा नयना पाटील, शहर उपाध्यक्ष रंजना पाटील, शहर सहचिटणीस चिंतामण गायकवाड, शहर पदाधिकारी शंकर भोईर, होमगार्ड अध्यक्ष नारायण पाटील, दिलीप पाटील, किशोर घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version