| मुंबई | प्रतिनिधी |
केवळ आठ कारखान्यांचा अपवाद वगळता मार्चअखेर महाराष्ट्राचा साखर हंगाम आटोपला असून, साखर उतारा आणि साखरनिर्मिती या दोन्ही बाबतीत मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. चालू हंगामात 80 लाख टन साखरनिर्मिती झाली असून गतहंगामाच्या तुलनेत तब्बल 30 लाख टनांची घट झाली आहे.
साखर उतार्यातही 0.76 टक्के इतकी अत्यंत मोठी घट झाली आहे. कारखान्यांच्या आणि पर्यायाने शेतकर्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. दरम्यान, गाळप, उतारा आणि साखरनिर्मिती या तिन्ही बाबतीत कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला आहे. राज्याचा हंगाम उशिरा म्हणजे 15 नोव्हेंबरला सुरू झाला तरीही मार्चअखेर आटोपला आहे. 200 कारखान्यांपैकी 192 कारखाने बंद झाले आहेत. आतापर्यंत 847 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून अवघ्या 9.47 टक्के उतार्यानुसार 80 लाख 26 हजार टन साखरनिर्मिती झाली आहे.
गतहंगामात 1073 लाख टन उसाचे गाळप होऊन 10.23 टक्के उतार्यानुसार 110 लाख टन साखरनिर्मिती झाली होती. उतार्यात मोठी घट झाल्याने शेतकर्यांच्या एफआऱपीवर आणि कारखान्याच्या साखरनिर्मितीवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. 30 लाख टनांची घटही साखरउद्योगातील अर्थकारणावर मोठा परिणाम करणारी ठरणार आहे. यामुळे सुमारे अकरा हजार कोटींचा फटका बसणार आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा गाळप (125 लाख टन) आणि उतारा (11.41 टक्के) मिळवून निर्विवादपणे प्रथम स्थानावर आहे. त्यापाठोपाठ अहिल्यानगर जिल्ह्यात 103 लाख टन गाळप झाले आहे. तर पुणे जिल्ह्यातील चौदा कारखान्यांनी 111 लाख टन गाळप करत तेहतीस कारखाने असलेल्या सोलापूरला (102 लाख टन) मागे टाकत गाळपात तिसरे स्थान पटकावले आहे. उतार्याबाबत कोल्हापूर, सांगली वगळता सर्वच जिल्ह्यांची अवस्था निराशाजनक आहे.