| कर्जत | प्रतिनिधी |
कोरोना काळात कर्जत रेल्वे स्थानकावरील गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले होते. ते पूर्ववत चालू करावेत, अशी मागणी प्रादेशिक रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीच्या बैठकीत झेडआरयूसीसी सदस्य नितीन परमार यांनी केली आहे.
कोरोना काळात कर्जत रेल्वे स्थानकावर मुंबई सीएसटीएमसह इतर सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले होते. ते सर्व थांबे पूर्ववत करावेत. पत्रासोबत ट्रेनची यादी दिली आहे. त्यात, प्रगती एक्सप्रेस क्रॉसिंगमुळे कोयना एक्सप्रेस अनेकदा मुख्य मार्गावर उभी राहते. कोयना एक्सप्रेसला मुख्य मार्गाऐवजी कर्जत स्थानकावर थांबा दिल्यास प्रवाशांना सोयीचे होईल. कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेसचा फक्त कर्जत थांबा रद्द करण्यात आला होता. कोविडनंतर, ती सर्व थांब्यांवर थांबत असून कर्जत येथे थांबा नाही. त्यामुळे कर्जत येथील थांबा पुन्हा सुरू करावा. पुणे ते मुंबई प्रगती एक्सप्रेस त्यानंतर दुपारी 3.15 वाजता डेक्कन एक्सप्रेस येते. या काळात कर्जत येथे कोणतीही एक्सप्रेस गाडी थांबत नाही. जर हैदराबाद एक्सप्रेस आणि एमजीआर चेन्नई सेंट्रल ते मुंबई एलटीटीला नियमित अंतराने कर्जत थांबा दिला तर कर्जत आणि आसपासच्या परिसरातील प्रवाशांसाठी ते सोयीचे होईल. त्याचबरोबर सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, मिरज बिकानेर एक्स्प्रेस, हडपसर-जोधपूर, दिवा-सावंतवाडी या गाड्यांना कर्जत स्थानकावर थांबा देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली आहे.