| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरात वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या दोन डॉक्टरांनी रायगड मेडिकल असो. आणि कर्जत मेडिकल असो. यांच्या माध्यमातून कर्जत ते पंढरपूर असा प्रवास सायकलवरून केला आहे. विठुरायाच्या भेटीला सायकल प्रवास करून जाणाऱ्या या दोन्ही डॉक्टरांचे कौतुक रायगड मेडिकल असो.तर्फे करण्यात आले आहे.
इंडो ॲथलेट सोसायटी पुणे यांनी आयोजित केलेल्या पुणे-पंढरपूर डिवोशनल सायकल राइडमध्ये रायगड मेडिकल असो. आणि कर्जत मेडिकल असो.चे सदस्य डॉ. नागेश चित्ते आणि डॉ. शरद तोडमल यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. त्यांनी या सायकल राईडमध्ये पुणे ते पंढरपूर असे 205 किलोमीटरचे अंतर अवघ्या 10 तास आणि 38 मिनिटांत पूर्ण केले. म्हणजेच सरासरी 19.4 कि.मी./तास या वेगाने सायकल चालवत हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. पुणे-पंढरपूर डिवोशनल सायकल राइडमध्ये घाट रस्ता तसेच या दुर्गम आणि आव्हानात्मक सायकल प्रवासात या दोन्ही डॉक्टरांनी साहस, चिकाटी आणि श्रद्धा दाखवत हे अंतर यशस्वी रित्या पूर्ण केले. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असतानाही त्यांनी आरोग्य व फिटनेससाठी दिलेले योगदान वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल रायगड व कर्जत मेडिकल असो. यांच्यावतीने नेरळ येथील धारप सभागृहात त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.