। मुंबई । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते.सलग 11 वेळा विधीमंडळात निवडूण येणारे, दिनदुबळ्या,कष्टकरी जनतेचे नेतृत्व करणारे स्व.गणपतराव देशमुख यांचा पुतळा विधीमंडळ आवारात उभारला जावा, अशी आग्रही मागणी शेकाप आ.जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केली.
सभागृहात शोकप्रस्तावावर बोलताना आ. जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना गणपतराव देशमुख यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सलग 11 वेळा एकाच मतदार संघातून, एकाच पक्षाकडून निवडूण येण्याचा विक्रम गणपतराव देशमुख यांनी केलेला आहे. त्या विक्रमाची नोंद देखील गिनीज बुकात झाली आहे. सांगोलासारख्या दुष्काळग्रस्त मतदारसंघात जोपर्यंत कृष्णा नदीचे पाणी येत नाही, तोपर्यंत मरणार नाही, अशी प्रतिज्ञाच त्यांनी केली होती. गेल्या वर्षी कृष्णेचे पाणी सांगोल्यात आले आणि त्यानंतरच गणपतराव देशमुख यांचे निधन झाले. ही आठवण देखील जयंत पाटील यांनी करुन दिली.
सभागृहात या शोकप्रस्ताववर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गणपतराव देशमुख यांचे स्मारक पुतळ्याच्या रुपाने विधानभवन परिसरात उभारले जावे, अशी मागणी केली आहे. त्या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सहमती दर्शविली आहे. त्यामुळे या सभागृहाने देखील गणपतराव देशमुख यांचा पुतळा उभारण्यासाठी अनुमती द्यावी, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.
मोरा येथील शिवमंदिर दुुरुस्त करा
शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी सभागृहामध्ये रायगड जिल्ह्यातील, मुरुड तालुक्यातील, विहूर ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या मोरा गावामधील एका शिवकलीन मंदिराच्या दुरूस्तीबाबत सखोल चौकशी करुन त्यावर बैठक घेऊन त्यासाठी परवानगी देण्याची मागणी राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली. हे मंदिर निसर्ग चक्रीवादळात पडले आहे. त्यामुळे या मंदिराची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. पण वन विभाग ती परवानगी देत नाही. त्याठिकाणी केवळ 100 मीटर वन भाग आहे. यासाठी वनविभागाने आडकाठी न करता अनुमती द्यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.